1 ते 19 वर्षे वयोगटातील बालकांसाठी आजपासून जंतनाशक मोहिम - डॉ. विवेक पाटील मोहिमेची प्रभावीपणे अंमलबजावणी करा
सांगली, दि. 20, : जिल्ह्यात 1 ते 19 वर्षे वयोगटातील शाळेतील व शाळाबाह्य बालकांसाठी शाळा व अंगणवाडी स्तरावर राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिम दि. 21 ते 28 सप्टेंबर या कालावधीत जंतनाशक गोळी देवून राबविण्यात येणार आहे. तसेच ज्या ठिकाणी शाळा सुरू नाहीत व शाळाबाह्य बालकांसाठी अंगणवाडी सेविका व आशा वर्कर्स यांच्याव्दारे घरोघरी जावून जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. या मोहिमेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. विवेक पाटील यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेच्या अंमलबजावणी संदर्भात आयोजित बैठकीत जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. विवेक पाटील बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पाटील, महानगरपालिका उपायुक्त राहुल रोकडे, वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल आंबोळे, बालसंगोपन अधिकारी डॉ. वैभव पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
डॉ. विवेक पाटील म्हणाले, 1 ते 19 वर्षे वयोगटातील किमान 28 टक्के बालकांमध्ये आढळणारा आतड्यांचा कृमीदोष हा मातीतून प्रसारित होणाऱ्या जंतापासून होतो. याचे प्रमुख कारण म्हणजे वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचा अभाव असणे आहे. कृमीदोष हा रक्तक्षय आणि कुपोषणाचे कारण आहेच. तसेच बालकांची शारिरीक व बौध्दिक वाढ खुंटण्याचे कारण ठरते. ही बाब लक्षात घेवून 1 ते 19 वर्षे वयोगटातील सर्व शालेय वयोगटातील विद्यार्थी (शाळेतील व शाळाबाह्य) यांना शाळा व अंगणवाडी स्तरावर जंतनाशक गोळेी देवून त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती व जीवनाचा दर्जा उंचावणे हा राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा उद्देश आहे. जंतनाशक मोहिमेची अंमलबजावणी राष्ट्रीय जंतनाशक दिन दि. 21 सप्टेंबर व 28 सप्टेंबर रोजी मॉप अप दिन संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबविला जाणार आहे.
या मोहिमेत ग्रामीण कार्यक्षेत्रातील 5 लाख 4 हजार 455, नगरपालिका क्षेत्रात 64 हजार 421, महानगरपालिका क्षेत्रात 1 लाख 21 हजार 578 असे एकूण 6 लाख 90 हजार 454 इतके लाभार्थी असल्याचे सांगून डॉ. विवेक पाटील म्हणाले, या मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा, तालुका व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर वैद्यकीय अधिक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी, शिक्षक, अंगणवाडी पर्यवेक्षक व सेविका, साधन शिक्षक, आशा वर्कर्स यांचे प्रशिक्षण घेण्यात आले आहे. मोहिम अंगणवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे. यामध्ये 3056 अंगणवाडी, 2868 साधन शिक्षक, 2069 आशा व 896 आरोग्य कर्मचारी सहभागी आहेत.
ॲल्बेंडेझॉल गोळी (जंतनाशक गोळी) 1 ते 2 वर्षे वयोगटातील मुला-मुलींना 200 मिलीग्रॅमची गोळी चुरा / पावडर करूनच पाण्यात मिसळून देण्यात येईल. 2 ते 19 वयोगटातील मुला-मुलींना 400 मिलीग्रॅमची गोळी चुरा / पावडर अथवा तुकडे करून खाण्यास स्वच्छ पाण्याबरोबर देण्यात येणार आहे. ॲल्बेंडेझॉल गोळी उपाशीपोटी देण्यात येणार नाही. गोळी खाल्यामुळे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत तथापी जंताचा प्रादुर्भाव (भुक कमी, वजन कमी आणि गालावर पांढरे चट्टे) असल्यास किरकोळ पोटदुखी, जळजळ अथवा क्वचित प्रसंगी मुलांना उलटी होऊ शकते. हे दुष्परिणाम किरकोळ स्वरपाचे असल्याने पालकांनी घाबरून जावू नये. अंगणवाडी व शाळेतील सर्व मुलांना गोळी खाण्यास दिल्यापासून दोन तास संपेपर्यंत मुलांना त्रास आहे किंवा कसे याची खात्री करण्यात येणार आहे. पालकांनी घाबरून न जाता कोणत्याही वयोगटातील मुलांना त्रास होत असल्यास त्वरीत आशा, आरोग्य सेविका / सेवक/साधन शिक्षक किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, आजारी असणाऱ्या बालकांना जंतनाशक दिनी / मॉप-अपदिनी ॲल्बेंडेझॉलची गोळी देण्यात येणार नाही. तथापि ते पूर्णत: बरे झाल्यानंतर जंतनाशक गोळी वैद्यकिय अधिकारी यांच्या सल्ल्याने देण्यात येणार आहे. 21 सप्टेंबर रोजी जंतनाशक गोळी काही करणाने घेतली नसल्यास दि. 28 सप्टेंबर मॉप अप राऊंड दिवशी जंतनाशक गोळी देण्यात येणार असल्याचे डॉ. विवेक पाटील यांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.