शहरी भागातील शाळा सुरु करा,शिक्षकांचं आंदोलन
औरंगाबाद: राज्यातील शहरी भागातील शाळा प्रत्यक्ष सुरू करण्यासाठी पुरोगामी शिक्षक आणि शिक्षेकत्तर संघटनांनी औरंगाबाद येथील क्रांती चौकात आंदोलन केले. यावेळी प्रत्यक्ष नाट्य सादर करून विद्यार्थी आणि शिक्षकांचे काय नुकसान होतेय हे दाखवण्याचा प्रयत्न केला. शालेय शिक्षण विभागानं शाळा सुरु करण्यासंदर्भात शासन निर्णय जारी केला होता. मात्र, कोरोनाचं कारण देतं त्या शासन निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षकांनी शाळा सुरु करण्यासाठी आंदोलन केलं आहे.
शाळा बंद असल्यानं बाल विवाहाचा धोका
भावी पिढी सक्षम व्हावी आणि शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यास मदत व्हावी, यासाठी शाळा सुरू करण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी या आंदोलकांकडून करण्यात आली.शाळा बंद असल्याने बाल विवाह होत असून हे थांबवा अशी मागणी ही करण्यात आली. यावेळी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
शाळा सुरु करण्याच्या निर्णयाला स्थगिती
शालेय शिक्षण विभागाने 17 ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याच्या काढलेल्या जीआरला सरकारने स्थगिती दिली होती. टास्क फोर्सच्या बैठकीनंतर निर्णय घेण्यात आला असून शाळा सुरु होण्यासाठी शासनाच्या नव्या आदेशाची वाट पाहावी लागणार आहे. शालेय शिक्षण विभागानं 10 ऑगस्टला कोरोना संसर्ग कमी झालेल्या ग्रामीण भागातील पाचवी ते सातवी आणि शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग 17 ऑगस्टपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. मंत्रिमंडळ बैठकीत काही मंत्र्यांनी निर्णयाचा फेरविचार करण्याची गरज व्यक्त केल्यानंतर हा निर्णय घेत शाळा सुरु करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती.
लसीकरण झालं नसल्यानं रिस्क नको
"टास्क फोर्सने भीती व्यक्त केली आहे. कारण दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचं अद्याप लसीकरण झालेलं नाही. इतर राज्यात असे प्रसंग घडलेले आहेत. रिस्क घेऊ नये, असं त्यांना वाटतं. त्यामुळे याबाबतची बैठक घेऊन अंतिम निर्णय होईल", असं राजेश टोपे यांनी सांगितलं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.