संजय राऊत घेणार मुख्यमंत्र्यांची भेट! राजकीय चर्चांना उधाण
मुंबई: शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी रवाना झाले आहेत. संजय राऊत आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचीही नुकतीच भेट झाली आहे, त्यांच्या भेटीत नेमकं काय संभाषण झालं आणि कोणत्या राजकीय गोष्टींवर चर्चा झाल्या या बदलची सविस्तर माहिती ते मुख्यमंत्र्यांशी करणार असल्याचं कळत आहे.
मराठा आरक्षणाबाबत शिवसेना होणार आक्रमक
दिल्लीत संसेदचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. शेवटच्या आठवड्यात शिवसेना मराठा आरक्षणावरून आक्रमक होण्याची चिन्ह आहेत. संजय राऊत आणि राहुल गांधींच्या भेटीमुळे चर्चांना उधाण आलं आहे. त्या भेटीमध्ये नेमकं काय ठरलं आणि कोणती राजनीती ठरली याची माहिती मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे भाजप नेतेही दिल्लीत गुप्त भेटी करत आहेत, त्यामुळे नवीन राजकीय बदलांचे वारे वाहत आहेत असं दिसून येत आहे.
संजय राऊत आणि राहुल गांधींच्या भेटीमागचं कारण काय?
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली असल्याची माहिती दिली आहे. 'खासदार राहुल गांधी यांच्याशी आज भेट झाली. गांधी यांच्याशी महाराष्ट्र तसेच राष्ट्रीय राजकारणावर सविस्तर चर्चा झाली. राज्य सरकारच्या कामा विषयी त्यांनी समाधान व्यक्त केले. शिवसेनेची जडणघडण तसेच कार्यपद्धती बाबत त्यांनी जाणून घेतले' अशी माहिती संजय राऊत यांनी ट्विट करुन दिली आहे.
महाविकास आघाडी सरकारमध्ये काही दिवसांपासून अंतर्गत वाद असल्याचे दिसून येत होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता पसरली आहे. महापालिका निवडणूक काँग्रेसनं लढवल्यास महाविकास आघाडीला मोठा धक्का बसू शकतो यामुळे संजय राऊत यांनी राहुल गांधी यांची घेतलेली भेटीमध्ये महत्त्वाची चर्चा झाली असल्याची शक्यता आहे.
दिल्लीत भाजप खासदारांची भेट
भाजपच्या गुप्त बैठकांमुळे चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, दिल्लीमध्ये भाजप आमदार आशिष शेलार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात नुकतीच गुप्त बैठक झाल्याची माहिती आहे. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनाही दिल्लीतून बोलावण्यात आल्याचं समोर आलं होतं. त्यातच, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार हे नेतेही दिल्ली दरबारी येत असल्याचं फडणवीसांनी सांगितलं. त्यामुळे दिल्लीत महाराष्ट्राविषयी काही शिजतंय का? असा सवाल उपस्थित होत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.