Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महापूराची कारणे आणि उपाय शोधण्यासाठी सांगलीत शनिवारी पूर परिषद पृथ्वीराज पाटील फाउंडेशनचा उपक्रम

महापूराची कारणे आणि उपाय शोधण्यासाठी सांगलीत शनिवारी पूर परिषद पृथ्वीराज पाटील फाउंडेशनचा उपक्रम


सांगली, दि. १९ :  २००५, २०१९ आणि आता २०२१ या वर्षांत कृष्णा, कोयणा, वारणा, पंचगंगा आणि अन्य नद्यांना आलेल्या महापुरामुळे सांगली - कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात एकच हाहाकार उडाला. महापुरामुळे या पट्ट्यात शेती, जनावरे, घरे, दुकाने आणि अन्य गोष्टींचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. वारंवार असा पूर येऊ लागला तर हे संकट कसे परतवून लावायचे हा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. त्यासाठी महापूराची कारणे आणि उपाय योजना यावर गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे, आणि म्हणूनच पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्यावतीने शनिवार, दि. २१ ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता पूर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. 

ही परिषद माधवनगर रोडवरील डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या हॉलमध्ये होणार आहे. ही परिषद ऑनलाइनही प्रसारित करण्यात येणार आहे.  परिषदेत या क्षेत्रातील काही नामवंत व्यक्तिंचा प्रामुख्याने सहभाग राहणार आहे.

परिषदेचे उद्घाटक व अध्यक्ष म्हणून जलसंपदामंत्री ना. जयंत पाटील हे उपस्थित राहणार असून सहकार व कृषी राज्यमंत्री ना. विश्वजीत कदम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ना. जयंत पाटील यांनी महापूर येण्याआधीच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी अलमट्टी धरणाचे पाणी सोडण्याबाबत चर्चा केली होती, तसेच महापुराच्यावेळी प्रचंड काम केले आहे. ना. विश्वजीत कदम यांनीही महापुरात काम केले आहे.

खासदार श्री. संजयकाका पाटील आणि आमदार श्री. सुधीर गाडगीळ यांचीही परिषदेला प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

याशिवाय 

1. श्री. राजेंद्र पवार 

भीमा खोरे पूर अभ्यास समितीचे अध्यक्ष तसेच २०१९ च्या पश्चिम महाराष्ट्रातील महापुराचा अभ्यास करणाऱ्या वडनेरे समितीचे सदस्य व महाराष्ट्र शासनातील सेवानिवृत्त प्रधान सचिव राजेंद्र पवार हे परिषदेतील प्रमुख वक्ते आहेत. वारंवार येणाऱ्या पुरासंबंधी नक्की काय धोरणात्मक बदल करायला हवेत, यावर ते आपली मते मांडणार आहेत.

2. श्री. मयुरेश प्रभुणे

गेली १२ वर्षे 'प्रोजेक्ट मेघदूत' अंतर्गत मान्सूनचा अभ्यास करणारे, सतर्क या उपक्रमाद्वारे दरड कोसळण्याची पूर्वसूचना देणारे युवा अभ्यासक, सेंटर फॉर सिटीजन सायन्सचे संचालक श्री. मयुरेश प्रभुणे हेही परिषदेत सहभागी होणार आहेत.

3. श्री. वसंत भोसले

गेली तीस वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेत असणारे व पश्चिम महाराष्ट्रातील प्रश्नांचे अभ्यासक, ज्येष्ठ पत्रकार, संपादक श्री. वसंत भोसले यांचाही परिषदेत सहभाग आहे. महापुरावर त्यांनी अभ्यासपूर्ण लेखन केले आहे.

4. श्री. प्रमोद चौगुले

सांगली जिल्ह्याच्या पर्यावरण पूरक विकासासाठी कार्यरत असणारे व इको फ्रेंडली शहर निर्माणाचा ध्यास घेतलेले आभाळमाया फौंडेशनचे संस्थापक, प्रख्यात आर्किटेक्ट श्री. प्रमोद चौगुले हेही सहभागी होणार आहेत. 

महापुराचा योग्य तो अभ्यास व्हावा आणि त्यावर कायमस्वरूपी उपाययोजनाही तातडीने कराव्यात, तसेच या संकटातून या पट्ट्यातील पूरग्रस्तांची सुटका व्हावी, या उद्देशाने परिषदेचे आयोजन केले आहे. त्याकरिता कुठलाही राजकीय अभिनिवेश न बाळगता खासदार श्री. संजयकाका पाटील आणि आमदार श्री. सुधीर गाडगीळ यांनाही निमंत्रित केले आहे. 

या परिषदेत मांडले जाणारे महत्त्वाचे मुद्दे आम्ही पूरमुक्त सांगलीसाठी मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील, महसूल मंत्री, ना. बाळासाहेब थोरात, मदत व पुर्नवसन मंत्री, ना. विजय वडेट्टीवार यांच्याकडे १० कलमी ठरावाद्वारे सादर करणार आहोत. उपाययोजना करण्यासाठी आघाडी सरकारकडे तसेच केंद्र सरकारकडे आपला पाठपुरावा राहणार आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.