महापुराचे संकट पाहता नवा गुंठेवारी कायदा नको पूरग्रस्तांना जास्तीत जास्त मदत करा - पृथ्वीराज पाटील
सांगली, दि. ४ : सांगली शहरातील सध्याच्या महापूर परिस्थितीचा विचार करता येथे गुंठेवारी कायद्याला मुदतवाढ देऊ नये अशी सूचना सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांनी केली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्यावतीने मुंबईत घेतलेल्या जिल्हा अध्यक्ष, आमदार, सर्व सेल आणि विभाग प्रमुखांच्या बैठकीत सांगली शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या कार्याचा आढावा पृथ्वीराज पाटील यांनी मांडला. अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष श्री. नाना पटोले हे होते.
सांगली शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीने कोविडमध्ये तसेच सद्या सांगली आणि परिसरात आलेल्या महापुरात चांगले काम केल्याबद्दल श्री. पटोले यांनी कौतुक केले.
यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी सुचविले की, कृष्णा नदीच्या महापुरामुळे सध्या सांगली शहर वेढले गेले आहे. अशा परिस्थितीत गुंठेवारी कायद्याला मुदतवाढ दिल्यास शहराचे आणखी विद्रुपीकरण वाढेल. त्यामुळे या कायद्याला मुदतवाढ देऊ नये. महापुरात नुकसान झालेल्या लोकांना २०१९ ला दिली होती, त्याहीपेक्षा जास्त मदत सरकारने तातडीने द्यावी. यासंदर्भात संबंधित मंत्र्यांशी बोलून योग्य ती कार्यवाही केली जाईल असे श्री. पटोले यांनी सांगितले.
केंद्रातील केंद्राच्या कृषी कायद्यामध्ये आवश्यक ते बदल करण्यासाठी सूचना मागवण्यासाठी तज्ञांची एक समिती गठित करावी अशी सूचनाही यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी केली. त्याची दखल घेऊन श्री. पटोले यांनी अशी समिती गठित करण्याची सूचनाही केली.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी पक्ष संघटना बळकट करा. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळेल, यासाठी कामाला लागा, असे आवाहन श्री. पटोले यांनी केले.
बैठकीला माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप, प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, बसवराज पाटील, प्रणिती शिंदे, कुणाल पाटील, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव सोनल पटेल, आशिष दुआ, वामसी रेड्डी, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे आदी उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.