सांगली : पालकमंत्र्यांच्या आधीच भाजपकडून भूमिपूजन
सांगली : महापालिकेच्या चिल्ड्रन पार्कचे अधिकृत उद्घाटन सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते नियोजित असताना भाजपने या कार्यक्रमास निमंत्रण नसल्याच्या निषेधार्थ पालकमंत्र्यांच्या आधीच भूमिपूजन करून घेतले.
सांगली महापालिकेच्या प्रभाग १७ मध्ये चिल्ड्रेन पार्क करण्यात येणार आहे याचे भूमिपूजन आज पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते दुपारी होणार होते. मात्र या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले नसल्याने भाजपचे पदाधिकारी, स्थानिक नगरसेवक नाराज होते. महापालिकेत स्थायी सभापती पांडुरंग कोरे आहेत तर सभागृह नेते विनायक सिंहासने आहेत शिवाय हे चिल्ड्रन पार्क महिला बालकल्याण समितीच्या निधीतून मंजूर करण्यात आले आहे. मात्र महिला बालकल्याण सभापती आणि प्रभाग सातारा मधील नगरसेविका गीतांजली पाटील यांनाही प्रशासनाने या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले नव्हते.
याच प्रभागात राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि विद्यमान महापौर दिग्विजय सूर्यवंशी हेही येतात. परंतु त्यांनी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता हा कार्यक्रम घेतल्याने भाजपचे नगरसेवक नाराज होते त्यांनी या कार्यक्रमाचा निषेध करून हे भूमिपूजन होऊ न देण्याचा निर्धार केला होता. मात्र आज भाजप नगरसेवकांनी आपला इरादा बदलून थेट या चिल्ड्रन्स पार्कचे भूमिपूजन करण्याचा निर्णय घेतला.
भाजपचे पदाधिकारी स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे, महापालिकेचे सभागृह नेते विनायक सिंहासने, महिला व बालकल्याण सभापती गीतांजली ढोपे पाटील, नगरसेविका स्वाती शिंदे, कल्पना कोळेकर, भारती दिगडे, स्थानिक नगरसेवक लक्ष्मण नवलाई, तसेच पदाधिकारी दीपक माने यांच्यासह कार्यकर्ते वाडीकर मंगल कार्यालय जवळ चिल्ड्रन पार्कच्या नियोजित कार्यक्रम स्थळी एकत्र आले. तेथे पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला होता. या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांची आणि पोलिसांची बाचाबाची झाली. पोलिसांनी या ठिकाणी भूमिपूजन करण्यास भाजपच्या पदाधिकाऱ्यांना विरोध केला. मात्र महिला बालकल्याण सभापती गीतांजली ढोपे पाटील, लक्ष्मण नवलाई आदींनी तेथेच रेड कार्पेटवर नारळ फोडून भूमिपूजन करून घेतले.
आयुक्तांचा काढता पाय
महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस हे भाजपचे कार्यकर्ते तेथे आले असताना समारंभस्थळी उपस्थित होते. यामुळे भाजपच्या नगरसेविका गीतांजली पाटील, सभागृह नेते सिंहासने, पदाधिकारी दीपक माने यांनी आयुक्तांना या कार्यक्रमाबाबत विचारणा केली असता आयुक्तांनी प्रशासनाचा या कार्यक्रमाशी संबंध नसल्याचे सांगितले. भाजपच्या नगरसेवक पदाधिकाऱ्यांचा संतप्त रागरंग पाहून आयुक्तांनी तेथून काढता पाय घेतला.नेमका कार्यक्रम घेतला कुणी ? सभागृह नेते विनायक सिंहासने म्हणाले, सकाळी ध्वजवंदना यावेळी महापौरांना या कार्यक्रमाबाबत विचारणा केली असता, त्यांनी हा कार्यक्रम प्रशासनाने घेतल्याचे सांगितले. तर आयुक्त म्हणतात या कार्यक्रमाशी प्रशासनाचा संबंध नाही. मग कार्यक्रमाचे आयोजन नेमके कोणी केले?
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.