संजय राऊत यांचा मेजर ध्यानचंद यांच्या नावाला विरोध आहे का?
माणगाव: शिवसेना नेते संजय राऊत यांनी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलण्यात आल्याने त्यावरून भाजप सरकारवर टीका केली होती. राऊत यांच्या या टीकेचा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी समाचार घेतला आहे. राऊत यांचा मेजर ध्यानचंद यांच्या नावाला विरोध आहे का?, असा सवाल प्रविण दरेकर यांनी केला आहे.
प्रविण दरेकर माणगावला आले होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना हा सवाल केला. पुरस्काराचं नाव बदललं म्हणून राऊत टीका करत आहेत. पण त्यांनी थोडं आत्मपरीक्षण करावं. महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर त्यांनी किती योजनांची नावं बदलली ते पाहावं, असा चिमटा काढतानाच राऊत यांचा मेजर ध्यानचंद यांच्या नावाला विरोध आहे का?, असा सवाल दरेकर यांनी केला.
व्यापाऱ्यांची बैठक घेणार
सरकारने मदत तर जाहीर केलेली आहे. पण ती खरंच पूरग्रस्तांना पोहोचली आहे की नाही त्याची पाहणी मी आज करणार आहे. त्यासाठीच माणगावला आलो आहे. रायगड जिल्ह्यातील माझा हा तिसऱ्यांदा दौरा आहे. व्यापाऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्यासंदर्भात आज मी महाडच्या व्यापारी संघटनांसोबत बैठक सुद्धा घेणार आहे, असं दरेकर म्हणाले.
मेट्रोचं काम आमचंच
यावेळी त्यांनी पुणे मेट्रो प्रकल्पावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. पुणे मेट्रोची सगळी कामं ही भाजपच्या काळात झालेली आहेत. परंतु फक्त सत्ता असल्यामुळे उद्घाटन करण्याचा मान या महाविकास आघाडी सरकारला मिळाला आहे, असा टोला त्यांनी लगावला. तसेच गल्लीतल्या नेत्यानी पंतप्रधानांवर टीका करू नये, असा टोलाही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना लगावला.
फडणवीसांकडून पाहणी
दरम्यान, पुणे मेट्रोच्या कामावरुन आता भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, मागील आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मेट्रोची ट्रायल रन पार पडली होती. त्यावेळी अजित पवार यांनी पुणे मेट्रोला हिरवा कंदिल दाखवला होता. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी करणार आहेत. देवेंद्र फडणवीस आज दुपारी 3 वाजता शिवाजीनगर इथल्या मुख्य टर्मिनसवरील मेट्रोच्या कामाची पाहणी करणार आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.