उद्धव ठाकरे म्हणतात,राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू करावा लागू शकतो'
जर परिस्थिती बिघडली, तर राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू करावा लागू शकतो," असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. स्वातंत्र्यदिनानंतर 16 ऑगस्टपासून राज्यात निर्बंध शिथिल करण्यात येत असले, तरी कोरोनाविषयीचे नियम पाळण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण सोहळा झाला. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, "गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचं संकट आहे आणि त्यातून मुक्त होण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत.
16 ऑगस्टपासून राज्यातील काही बंधनं शिथिल करतो आहोत. पण कोरोनाचं संकट अजूनही टळलेलं नाही. काही देशांत ते पुन्हा उसळलं आहे. आपल्याकडे ते उसळू नये, यासाठी काळजी घ्यायला हवी. शिथिलतेसोबतच इशाराही दिला आहे, तोही नागरिकांनी लक्षात घ्यावा.
"कोरोना काळात आपण आरोग्यसुविधा वाढवत आहोत. पण ऑक्सिजनची कमतरता चिंतेचा विषय आहे. म्हणून ही शिथिलता देत असताना ऑक्सिजनच्या साठ्याचं प्रमाण ठरवून आपण ही शिथिलता दिली आहे.
"त्यामुळे कृपा करून दिलेल्या शिथिलतेमध्ये देखील आवश्यक असलेले निर्बंध पाळावे लागतील. कारण ऑक्सिजनचा पुरवठा त्या मर्यादेच्या पुढे गेला, तर कदाचित आपल्याला लॉकडाऊन पुन्हा लावावा लागू शकतो," असं ते म्हणाले.
"जर राज्यात तिसरी लाट आली आणि त्यामध्ये दिवसाचा आपला ऑक्सिजन वापर 700 मेट्रिक टनाच्या वर गेला, तर राज्यात ऑटोमॅटिक मोडवर कठोर लॉकडाउन लागू केला जाईल", असं राजेश टोपेंनी स्पष्ट केलं होतं. त्यासंदर्भात आज स्वातंत्र्यदिनी मंत्रालयात ध्वजारोहण केल्यानंतर केलेल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी पुन्हा इशारा दिला आहे.
काही दिवसांपूर्वीच राज्यात कोरोना नियमावली शिथिल करण्यात आली आहे. दोन डोस घेऊन 14 दिवस झालेल्या नागरिकांना प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे.
उपहार गृहांना रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. उपहारगृह बारमध्ये प्रवेश करताना प्रतीक्षा कक्षात अथवा जेवण मिळेपर्यंतच्या कालावधीत मास्कचा वापर अनिवार्य राहील व याबाबतच्या स्पष्ट सूचना उपहारगृह आस्थापनांनी उपहारगृहात लावणे आवश्यक राहील.
उपहारगृह बारमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे कोव्हिड प्रतिबंधक लसीकरण करणे आवश्यक राहील. लशीचे दोन डोस घेतलेलेच कर्मचारी उपाहारगृहात काम करू शकतील. मास्कचा वापर बंधनकारक.
वातानुकुलित उपहारगृह / बार असल्यास, वायुविजनासाठी खिडक्या असल्यास कमीत कमी दोन खिडक्या किंवा दरवाजा उघडा ठेवून आतील हवा खेळती राहण्यासाठी पंखे लावणे आवश्यक राहील
राज्यातील सर्व शॉपिंग मॉल्स सर्व दिवस रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. वातानुकुलित तसेच विनावातानुकुलित जिम्नॅशिअम, योगसेंटर, सलून स्पा 50 टक्के क्षमतेने सर्व दिवस रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
खाजगी कार्यालयाना वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी कार्यालये 24 तास सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. मात्र अशा सत्र व्यवस्थापनांतर्गत कार्यालयांना एका सत्रात कार्यालयातील एकूण कर्मचारी संख्येच्या 25 टक्के उपस्थिती मर्यादित करणे आवश्यक राहील.
राज्यातील सर्व मैदाने, उद्याने, चौपाटया, समुद्रकिनारे स्थानिक प्राधिकरणाने विहित केल्यानुसार त्यांच्या नियमित वेळेत सुरू राहतील.
खुल्या प्रांगणातील/लॉन वरील किंवा बंदिस्त मंगल कार्यालयातील विवाह सोहळे संबंधित प्रांगण/ लॉन / मंगल कार्यालय / हॉटेल मधील आसन व्यवस्थेच्या 50 टक्के क्षमतेने व कोव्हिड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे संपूर्ण पालन होईल या अटीवर मंगल कार्यालयाच्या प्रयोजनार्थ सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे.
खुल्या प्रांगण / लॉन मध्ये होणाऱ्या विवाह सोहळ्यास उपस्थितांची संख्या प्रांगण किंवा लॉन क्षमतेच्या 50 टक्के परंतु जास्तीत जास्त 200 व्यक्तींना परवानगी. बंदिस्त मंगल कार्यालय /हॉटेलमध्ये उपस्थितांची संख्या क्षमतेच्या 50 टक्के परंतु जास्तीत जास्त 100 व्यक्तींची मर्यादा.
मात्र सिनेमागृह/नाट्यगृह, मल्टिप्लेक्स (स्वतंत्र तसेच शॉपिंग मॉलमधील ) पुढील आदेशापर्यंत बंद राहतील. सर्व धार्मिक स्थळे पुढील आदेशापर्यंत नागरिकांसाठी बंद राहतील.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.