Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कोरोनापासून बचावासाठी जिल्ह्यातील प्रत्येकाने लस घ्यावी - राजेश टोपे

 कोरोनापासून बचावासाठी जिल्ह्यातील प्रत्येकाने लस घ्यावी - राजेश टोपे


जालना : आजघडीला जालना जिल्ह्यात रुग्णवाढीचे प्रमाण कमी होऊन रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोनापासून बचावासाठी कवचकुंडलाची भूमिका बजावणाऱ्या लसीकरणालाही जिल्ह्यात गती देण्यात येत आहे. लस ही अत्यंत सुरक्षित व फायदेशीर असून मनामध्ये कुठलीही शंका न बाळगता जिल्ह्यातील प्रत्येकाने लस टोचून घेण्याचे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले. त्याप्रसंगी जनतेला उद्देशून शुभेच्छा संदेश देताना ते बोलत होते.

पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले, गेल्या दीड वर्षापासून संपूर्ण देश कोरोना महामारीच्या संकटाचा समर्थपणे मुकाबला करत आहे. जालना जिल्ह्यात आजघडीला कोरोनाची पहिली व दुसरी लाट ओसरल्याचे चित्र दिसत असून रुग्णवाढीचे प्रमाण कमी होण्याबरोबरच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यातील सर्व डॉक्टर्स, नर्स, प्रशासनातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्यासह सर्वसामान्य जनतेच्या योगदानामुळे हे शक्य झाले असून कोरोना काळात अडचणीत असलेल्या नागरिक तसेच रुग्णांना अनेकांनी निस्वार्थपणे मदत करुन माणुसकीचे दर्शन घडविले. जिल्ह्यात आरोग्याच्या सर्व सोयी-सुविधा अधिक चांगल्या पद्धतीने पुरवण्यात आल्याने आपल्या जिल्ह्यासह ईतर जिल्ह्यातील रुग्णांनी जालना येथील कोव्हीड हॉस्पीटलमध्ये येऊन उपचार घेण्यास पसंती दर्शविल्याने शासकीय रुग्णालयाच्या सेवेबाबत एक विश्वासार्हता निर्माण झाली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

जालना जिल्ह्यात गत दीड वर्षामध्ये आरोग्य सेवेचे सक्षमीकरण करण्यावर अधिक प्रमाणात भर देण्यात आला असून कोव्हीड हॉस्पीटलचे अद्ययावतीकरण करण्यात आले. या ठिकाणी मुबलक प्रमाणात बेडची निर्मिती, लिक्वीड ऑक्सिजन प्लँट, पीएसए प्लँट, स्वतंत्र आरटीपीसीआर लॅब यासह ईतर आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा पुरविण्यात आल्या. केवळ जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणीच नव्हे तर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ऑक्सिजन प्लँटची उभारणी करण्याबरोबरच ग्रामीण भागातील जनतेला त्यांच्याच तालुक्यात उपचार मिळावेत यासाठी ग्रामीण रुग्णालयांचे बळकटीकरण व कोव्हीड केअर सेंटरर्सची निर्मिती करण्यात येऊन उपचाराची सोय करुन देण्यात आली. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्ह्याचे आरोग्य प्रशासन सज्ज असल्याचे सांगत सुसज्ज व सर्व सुविधांनी युक्त अशा 100 खाटांच्या मेडीकॅब हॉस्पीटलची उभारणी अवघ्या एका महिन्यात करण्यात आली असल्याचेही पालकमंत्री टोपे यांनी यावेळी सांगितले.


शेतकऱ्यांप्रती सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी शासन अनेकविध योजना राबवित असून शेतकऱ्यांना देय असलेल्या कोणत्याही योजनेचा थेट लाभ देणे, खातेदारनिहाय पीककर्ज अथवा पीकविमा भरणे, पीक नुकसान भरपाई अदा करणे तसेच पीकनिहाय लागवडीचे क्षेत्र व उत्पन्नाचा अचूक अंदाज काढण्यासाठी शासनामार्फत ई-पीक पाहणी ही आज्ञावली विकसित करण्यात आली असून संपूर्ण राज्यभर याचा आज शुभारंभ होत आहे. या ई-पीक पाहणी कार्यक्रमाचा जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहनही पालकमंत्री टोपे यांनी यावेळी केले.

पेरणीसाठी शेतकऱ्यांना सातत्याने पीककर्जाची आवश्यकता असते सन 2021-22 या वर्षासाठी खरीप पीककर्ज वितरणासाठी 1179 कोटी 52 लक्ष तर रब्बी पीककर्ज वाटपासाठी 470 कोटी 48 लक्ष एवढा लक्षांक आहे. जिल्ह्यातील 20 बँकांच्या एकुण 175 शाखांच्या माध्यमातुन खरीपासाठी 90 हजार 595 शेतकऱ्यांना 448 कोटी 71 लक्ष रुपयांच्या पीककर्जाचे वाटप करण्यात आले असले तरी या कर्जवाटपाची गती वाढविण्याची गरज आहे.

प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कर्जवाटपाचा सातत्याने आढावा घेऊन जिल्ह्यातील गरजु व पात्र शेतकऱ्यांना विहित वेळेत कर्ज मिळेल, यादृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सुचना करत शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये भर पडुन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना अत्यंत फायदेशीर ठरत असल्याने या योजनेसही जिल्ह्यात गती देण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

कोरोना या महामारीमध्ये प्रशिक्षित वैद्यकीय मनुष्यबळाची कमतरता जाणवत असून ही बाब लक्षात घेत केंद्र शासनाच्या स्किल इंडिया या संकल्पनेस अनुसरुन महाराष्ट्र राज्याने कुशल महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र हे ध्येय समोर ठेवले आहे. राज्यातील युवक-युवतींचे कौशल्य विकासाद्वारे सक्षमीकरण करुन त्यांना अधिक मागणी असलेल्या उद्योग, सेवा व तत्सम क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत सन 2021-22 साठी जालना जिल्ह्यात 600 उमेदवारांना जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयांमधुन मोफत कौशल्य प्रशिक्षणाचा लाभ देण्यात येत असल्याचेही पालकमंत्री टोपे यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यातील विकासाला अधिक गती देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अत्यंत उपयुक्त असून या योजनेच्या माध्यमातुन विविध प्रकारची विकासाची कामे करता येणे शक्य आहे. कोरोना महामारीमुळे राज्याच्या निधीचा मोठा हिस्सा हा आरोग्य सेवेवर खर्च होत असल्याने विकास कामे करताना अडचणी निर्माण होत आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.