तुम्ही एक दोन विदेशी कंपन्या विकत घेतलात तर देशहित कमी झालं? पीयुष गोयलांच्या टाटा समुहाबद्दलच्या वक्तव्यावर वाद
कॉन्फडरेशन ऑफ इंडिया इंडस्ट्री संघटनेच्या वार्षिक बैठकीदरम्यान पीयूष गोयल यांनी हे भाष्य केले. पीयूष गोयल यांनी बैठकीला उपस्थित असणारे टाटा सन्सच्या पायाभूत सुविधा, संरक्षण आणि अंतराळ विभागाचे अध्यक्ष बनमाली अग्रवाला यांना उद्देशून म्हटले की, तुमच्यासारखी कंपनी एक-दोन परदेशी कंपन्या विकत घेते. त्यानंतर परदेशी कंपन्यांचे महत्त्व वाढते आणि राष्ट्रहित बाजूला पडते, असे गोयल यांनी म्हटले. इतकेच नव्हे तर आपण ही गोष्ट टाटा सन्सचे अध्यक्ष एन.चंद्रशेखरन यांनाही सांगितल्याचे पीयूष गोयल यांनी म्हटले. टाटा समूहाने यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला असला तरी हा मुद्दा आता चांगलाच तापला आहे.
या सगळ्या वादानंतर पीयूष गोयल यांच्या वक्तव्याचा व्हीडिओ युट्युबरुन हटवण्यात आला. मात्र, राजकीय पक्षांनी या वादात उडी घेतल्याने हा मुद्दा आणखीनच तापण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी मोदी सरकारवर टीका केली. कोणत्याही चिथावणीशिवाय पीयूष गोयल यांनी भारतीय उद्योगांवर केलेल्या या हल्ल्यामुळे मी स्तब्ध झालो आहे. पावसाळी अधिवेशनात राज्यसभेचे कामकाज चालणार नाही, याची पूर्ण काळजी पीयूष गोयल यांनी घेतली. आता त्यांनी हे वक्तव्य केले आहे. वरिष्ठांच्या परवानगीशिवाय पीयूष गोयल अशाप्रकारचे वक्तव्य करु शकत नाहीत, असेही जयराम रमेश यांनी म्हटले.
*म्हणून गोयल यांनी टाटा समूहाला लक्ष्य केले?
टाटा समूहाबद्दल गोयल यांच्या टीकेला जुलै महिन्यांत ई-व्यापारविषयक नियमांसंदर्भात उद्योगजगताच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीची पार्श्वभूमी आहे. त्या बैठकीत केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या ई-व्यापारविषयक नियमांचा या क्षेत्रातील कंपन्यांच्या व्यवसायावर वाईट परिणाम होईल, असे नमूद करीत टाटा समूहाने घेतलेल्या आक्षेपाचे वृत्तही प्रसिद्ध झाले होते. व्यवसायात भागीदार असणाऱ्या 'स्टारबक्स'ला टाटांच्या ई-विक्रय संकेतस्थळावरून त्यांची उत्पादने विकण्यापासून प्रतिबंधित केले जावे, हे विपरीतच आहे, अशा आशयाच्या टाटा समूहाने केलेल्या टीकेचे प्रत्युत्तर गोयल यांनी अशा तऱ्हेने दिल्याची चर्चा आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.