पुणेकरांसाठी महापालिकेची 'अभय योजना', अनधिकृत नळजोडणी नियमित करण्याची सुवर्णसंधी
पुणे : पुणेकरांसाठी महापालिका सातत्यानं नवनवीन योजना घेऊन येत असते. यावेळी महापालिकेनं महापालिका हद्दीतल्या अनधिकृत नळधारकांसाठी एक महत्वाची अशी अभय योजना आणली आहे. ज्या योजनेच्या माध्यमातून अनधिकृत नळजोडणी नियमित करता येणं शक्य आहे. मात्र, यासाठी काही अटी घालून दिलेल्या आहेत. ज्यांची पूर्तता केल्यानंतर तुमची अनधिकृत नळजोडणी नियमित होऊ शकेल.
काय आहेत अटी?
१. ही अभय योजना फक्त निवासी आणि व्यापारी आस्थापनांनी घेतलेल्या अनधिकृत नळजोडांसाठीच लागू राहील.
२. ही योजना फक्त तीन महिन्यांसाठीच लागू राहील.
३. ही योजना फक्त १ जून २०२१ पूर्वी अस्तित्वात असलेल्या अनधिकृत नळजोडणींसाठीच लागू राहील. त्यानंतर घेण्यात आलेल्या सर्व अनधिकृत नळजोडांवर कारवाई करण्यात येईल.
कसा आणि कुठे कराल अर्ज?
योजना जाहीर झाल्यानंतर ३ महिन्यांच्या आत तुम्हाला अनधिकृत नळजोडणी नियमित करण्यासाठी अर्ज करायचा आहे. यासाठी साध्या कागदावर मनपाच्या पाणीपुरवठा विभागाच्या संबंधित झोनच्या (स्वारगेट/ सावरकर भवन/ एसएनडीटी/ चतु:श्रुंगी/ बंडगार्डन/ लष्कर) कार्यकारी अभियंत्यांकडे अर्ज करायचा आहे. या अर्जात अभय योजनेसाठी अर्ज करत असल्याचं नमूद करायचं आहे.
अर्जामध्ये नाव, पत्ता, मोबाईल नंबर लिहून सोबत एमएसईबी किंवा टेलिफोन बिल, आधारकार्डची प्रत, मालकीहक्काची कागदपत्रं जोडायची आहेत.
अर्ज मिळाल्यानंतर पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांकडून जागेची पाहणी केली जाईल. त्यानंतर नियमानुसार पात्र नळजोडण्या नियमित करण्यात येतील. अपात्र जोडण्यांवर कारवाई केली जाईल. सोबतच एक इंच व्यासापेक्षा जास्त व्यासाचे नळजोडणी नियमित केले जाणार नाहीत.
किती आकारलं जाणार शुल्क?
प्रत्येक नियमित करण्यात आलेल्या अनधिकृत नळजोडासाठी त्याच्या व्यासाप्रमाणे शुल्का आकारण्यात येणार आहे. अर्धा इंच व्यासाच्या निवासी नळजोडणीसाठी ४ हजार तर व्यापारी नळजोडणीसाठी ८ हजार शुल्क आकारण्यात येईल. पाऊण इंच व्यासाच्या निवासी नळजोडणीसाठी ७ हजार ५०० तर व्यापारी नळजोडणीसाठी १५ हजार आणि १ इंच व्यासाच्या निवासी नळजोडणीसाठी १९ हजार ५०० आणि व्यापारी नळजोडणीसाठी ३५ हजार ५०० रुपये शुल्का आकारण्यात येणार आहे.
नळजोडणी अधिकृत करण्यासाठी अर्जदाराने आपल्या नळजोडणीनुसार ही रक्कम महापालिकेत भरायची आहे. त्यानंतर अनधिकृतरित्या घेतलेली नळजोडणी नियमित असल्याचं समजलं जाईल. सोबतच सर्व रक्कम भरल्यानंतर मनपाकडून नियमित करण्यात आलेल्या नळजोडाला नि:शुल्क AMR मीटर बसवण्यात येणार आहे.
पाणीपुरवठा अभय योजनेमध्ये चाळ विभाग, अनधिकृत झोपडपट्टी, गांवठाण, गुंठेवारीनुसार केलेली घरे यांचाही समावेश करण्यात आला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.