Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

चंद्रकांत पाटलांनी केलं मोठं विधान; राणेंच्या अटकेसाठी थेट पोलिसांशी संवाद, अनिल परब अडचणीत येणार?

चंद्रकांत पाटलांनी केलं मोठं विधान; राणेंच्या अटकेसाठी थेट पोलिसांशी संवाद, अनिल परब अडचणीत येणार?


पुणे: केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब हे थेट पोलिसांशी संवाद साधत असल्याची क्लिप व्हायरल झाली आहे. त्यावरून भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. परब यांच्याविरोधात थेट कोर्टात जाणार असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. 

चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी संवाद ही माहिती दिली. आम्ही अनिल परब यांच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल करणार आहोत. आम्ही ड्राफ्टिंग केलं आहे. टीव्ही9ने दाखवलेली क्लिप सर्व जगाने पाहिली आहे. किती कायदा हातात घेणं चाललं आहे? किती अरेरावी चालली आहे? पोलिसांच्या आणि गुंडाच्या बळावर हे सरकार चाललं आहे. यांच्यात सरकार चालवण्याची हिंमत नाही. ती क्लिप घेऊन आम्ही कोर्टात जाणार आहोत. हे कशात बसतं हे विचारणार आहोत, असं पाटील यांनी सांगितलं.

सत्याचा विजय झाला

एकूणच महाराष्ट्रात काल दिवसभरात झालेला राजकीय खेळ हा सूडबुद्धीने झाल्याचं सिद्ध झालं आहे. न्यायालयात सरकारने मांडलेला कोणताही मुद्दा टिकला नाही. न्यायालयाने राणेंना पूर्णपणे मोकळीक दिली. जामीन दिला. अशा प्रकारच्या कोणत्याही घटनेनंतर टेक्निकल कंडिशन ज्या असतात त्या घातल्या. दोनदा अलिबाग पोलीस ठाण्याला.. पोलीस ठाण्यालाही म्हटलं नाही, जिल्ह्यांच्या एसपींकडे त्यांनी हजेरी लावली पाहिजे. त्यांच्या आवाजाची चाचणी करण्याची पोलिसांना आवश्यकता वाटली तर त्यांना सात दिवसांची नोटीस दिली पाहिजे, या पुढे बोलताना त्यांनी काही गोष्टी सांभाळल्या पाहिजे, असं कोर्टाने म्हटलं आहे. पण यातून सत्याचा विजय झाला हे स्पष्ट झालं. गेल्या 20 महिन्यांपासून सरकारला प्रत्येक विषयात कोर्टाच्या थपडात खाव्या लागल्या. कायद्याचा दुरुपयोग केल्याचंच कोर्टाने प्रत्येकवेळी स्पष्ट केलं आहे, असं ते म्हणाले.


 

रात गई बात गई

भाजप कधीही मनात खुन्नस ठेवून लाँग टर्म काम करत नाही. रात गई बात गई. राणेंना जामीन झालेला आहे. राणेंची खूप तब्येत बिघडली. जेवताना त्यांच्या हातातील ताट काढून घेण्यात आलं. हे अमानवी होतं. त्यांचं बीपी वाढलं होतं. त्यांना कोणतीही मेडिकल ट्रीटमेंट दिली नाही. अडीच तास संगमेश्वर पोलीस ठाण्यात बसून ठेवलं. हे अत्यंत अमानवी झालं. ते एखाद दिवस आराम करतील. शुगर, बीपी नॉर्मल झालं की बहुदा उद्या यात्रा सुरू होईल, असंही त्यांनी सांगितलं.

संपूर्ण राज्यातच संचारबंदी लावा ना

सरकार किती घाबरट आहे. काल रात्री 12 वाजल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात संचारबंदी लागू केली. अरे वा सिंधुदुर्गातच प्रॉब्लेम आहे का? संपूर्ण महाराष्ट्र पेटला. सगळीकडेच संचारबंदी लावा. संचारबंदी लावल्याने काय होतंय? राणेंच्या यात्रेला मुंबईत प्रचंड प्रतिसाद मिळाला. महापालिका हरली तर काय राहीलं? असं वाटल्यानेच त्यांनी हा प्रकार केला. हे उशिरा सूचलेलं शहाणपण आहे. शिवसैनिकांमध्ये उत्साह भरण्याचा हा प्रयत्न आहे. राणे एवढे ठोकतात तुम्ही काहीच बोलत नाहीत. त्यामुळेच हा लटका प्रयत्न झाला. त्यातूनच सिंधुदुर्गात संचारबंदी लावण्यात आली आहे. त्याने आमच्यावर काहीही परिणाम होणार नाही. राणेंच्या तब्येतीमुळेच आम्ही थांबलो. उद्या सकाळी त्यांची तब्येत बरी झाली तर जन आशीर्वाद सुरू होईल, असं त्यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री त्यांचे अभिनंदन कसे करतात?

कायद्या सुव्यवस्थेवर होणारा परिणाम ही आमची जबाबदारी नाही. टाळी एका हाताने वाजत नाही. ज्यावेळी काहीशे लोकं राणेंच्या घरासमोर येतात तेव्हा कायदा सुव्यवस्था ढासळत नाहीत का? आणि या कार्यकर्त्यांचं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अभिनंदन करतात म्हणजे तुम्ही एका अर्थाने राणेंचं घर फोडणाऱ्यांचं अभिनंदन केलं. कायदा आणि सुव्यवस्था कुणाला शिकवता?, असा सवालही त्यांनी केला. 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.