Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजप प्रदेशाध्यक्ष बदलणार?

 चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजप प्रदेशाध्यक्ष बदलणार?



नवी दिल्ली: भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदावरून चंद्रकांत पाटील यांची उचलबांगडी होण्याची चर्चा आहे. त्यातच चंद्रकांत पाटलांसह महाराष्ट्रातील काही नेते दिल्लीत दाखल झाल्याने या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत.

चंद्रकांत पाटील कालपासून दिल्लीत आहेत. आज त्यांनी उद्योगमंत्री नारायण राणे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. भाजपचा प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या चर्चा फक्त मीडियात आहेत. आमच्या पक्षात तशी चर्चा नाही. प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा विचारही नाही. खरं तर भाजप काय आहे हे तुम्हाला कळलं नाही. सर्वसामान्य माणसांनाही भाजप समजली पाहिजे, असं सांगतानाच दर तीन वर्षाने आमच्या पक्षात फेरबदल होतो. अगदी ग्रासरुटच्या पदापासून ते राष्ट्रीय अध्यक्षपदापर्यंत हा बदल होत असतो, असं पाटील म्हणाले. काँग्रेसला वर्षभरापासून पक्षाध्यक्ष मिळत नाही. भाजपमध्ये तसं नाही. त्यामुळे भाजपचा प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याच्या या निव्वळ चर्चा असून त्यात काही तथ्य नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

दौऱ्यामागे राजकीय हेतू नाही

यावेळी पाटील यांनी दिल्लीत येण्याविषयीचं कारणही स्पष्ट केलं. पहिल्यांदाच केंद्रात राज्याला जास्त मंत्रीपदे मिळाली आहेत. त्यामुळे राज्यातील मंत्र्यांचं अभिनंदन करण्यासाठी दिल्लीत आलो. त्यांच्या मतदारसंघात जाऊन या मंत्र्यांचं अभिनंदन करणार आहेच. पण दिल्लीत येऊनही त्यांचं अभिनंदन करणं आवश्यक होतं. त्यामुळे मी दिल्लीत आलोय. दिल्ली दौऱ्यामागे काहीच राजकीय हेतू नाही, असं सांगतानाच या मंत्र्यांची खाती समजून घेतली. त्याचा राज्याला कसा फायदा होईल, यावरही या भेटीत चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं.

चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष होणार?

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या ऐवजी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद देण्याचं भाजपमध्ये घटत आहे. केंद्रात भाजपने अधिकाधिक ओबीसी नेत्यांना मंत्रिपदं दिली आहेत. राज्यातही ओबीसी आरक्षणासाठी ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. या पार्श्वभूमीवर ओबीसी चेहरा म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद देण्याच्या हालचाली भाजपमध्ये सुरू आहेत. त्यामुळे भाजप नेमका काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.