पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी गेलेल्या केजरीवालांना विरोध; भाषणादरम्यान स्टेजवरून पडले खाली
नवी दिल्ली : दिल्लीमध्ये एका नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भयंकर बाब म्हणजे आरोपींनी मुलीवर जबरदस्तीने अंत्यसंस्कार देखील केले आणि तिच्या कुटुंबाला विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची खोटी माहिती दिली. तसेच पोलिसांना याबाबत माहिती देऊ नका असं देखील तिच्या कुटुंबीयांना सांगितलं. दिल्ली कंटोनमेंट परिसरातील नांगल गावात ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. तसेच याची कसून चौकशी करण्यात येत आहे. तसेच या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याच दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पीडित कुटुंबाला भेटायला आले, तेव्हा त्यांना विरोधाला सामोरं जावं लागलं आहे.
अरविंद केजरीवाल यांनी विरोधाचा सामना करत पीडित कुटुंबाची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री तेथील एका स्टेजवर पोहचले. गर्दीमुळे ते स्टेजवरून खाली पडले. मात्र त्यांना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सांभाळले. त्यानंतर अरविंद केजरीवाल कारमध्ये बसून निघून गेले.या घटनेवरून भाजपा आणि आप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. दिल्ली सरकारने पीडितेच्या कुटुंबाला दहा लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. यासह, आता या प्रकरणाची दंडाधिकारी चौकशी केली जाईल. अरविंद केजरीवाल यांनी "सरकारकडून मोठे वकील लावले जातील. जेणेकरून दोषींना कठोर शिक्षा मिळू शकेल. केंद्र सरकारने दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यासाठी कठोर पावले उचलावीत, आम्ही पूर्ण सहकार्य करू" असं म्हटलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी रविवारी संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास स्मशानभूमीत असणाऱ्या कूलरमधून थंड पाणी आणण्यासाठी घऱाबाहेर पडली होती. पण घऱातून बाहेर पडलेली मुलगी परतलीच नाही. जवळपास सहाच्या सुमारास स्मशानमभूमीतील पुजारी आणि पीडितेच्या आईच्या ओळखीतल्या काही जणांनी फोन करुन त्यांना बोलावलं आणि मुलीचा मृतदेह दाखवला. वॉटर कूलरमधून पाणी पित असताना विजेचा धक्का लागून तिचा मृत्यू झाला असं त्यांनी पीडितेच्या आईला सांगितलं. यानंतर त्या पुजारी आणि इतर आरोपींनी मुलीच्या आईला पोलिसांना फोन करू नका, नाहीतर यामुळे गुन्हा दाखल होईल आणि पोस्टमॉर्टम करत तिच्या अवयवांची चोरी होईल असं सांगत घाबरवलं.
मुलीच्या हातावर जखमा होत्या तसेच तिचे ओठ निळे पडले होते अशी माहिती मुलीच्या आईने पोलिसांनी दिली आहे. यानंतर महिलेची संमती नसतानाही मुलीवर जबरदस्तीने अंत्यसंस्कार करण्यात आले. महिलेने आपल्या पतीला फोन करुन घटनेची माहिती दिली. यानंतर जवळपास 200 लोक स्मशानभूमीजवळ जमा झाले आणि त्यांनी पोलिसांना कळवलं. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक केली आहे. क्राइम ब्रांच आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरुन पुरावे जमा केले असून याप्रकरणी तपास सुरू आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.