Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

स्क्रॅप पॉलिसीमध्ये पुण्यातली 3 लाख वाहनं निघणार भंगारात;वाहनधारकांना मिळणार लाभ

 स्क्रॅप पॉलिसीमध्ये पुण्यातली 3 लाख वाहनं निघणार भंगारात;वाहनधारकांना मिळणार लाभ

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  नुकतीच वेहिकल स्क्रॅपिंग पॉलिसीची  घोषणा केली. नव्या स्क्रॅप पॉलिसीअंतर्गत 15 आणि 20 वर्ष जुनी वाहने भंगारात काढली जाणार आहेत. ही पॉलिसी व्यावसायिक, सरकारी आणि खासगी वाहनांना लागू होते. स्क्रॅप पॉलिसी लागू झाल्यानंतर पुण्यातली जवळपास 3 लाख वाहनं भंगारात जाऊ शकतात. 

पुण्यात 3 लाख वाहनं भंगारात निघणार

पुणे आरटीओकडे  असणाऱ्या नोंदीप्रमाणे पंधरा वर्षांवरच्या जुन्या खासगी वाहनांची संख्या 2 लाख 60 हजारांच्या जवळ आहे. तर 10 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या वाहनांची संख्या 40 हजारांच्या घरात आहे. ही वाहनं स्क्रॅपेज पॉलिसीनुसार भंगारात जाऊ शकतात. वाहन भंगारात दिल्यानंतर वाहनधारकांना प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. त्याचा फायदा त्यांना नवीन वाहन घेताना होणार आहे. या प्रमाणपत्रामुळे नवीन वाहनाच्या किमतीत 15 ते 25 टक्के सवलत मिळू शकणार आहे.

स्क्रॅपेज पॉलिसी काय आहे?

केंद्र सरकारची स्क्रॅपेज पॉलिसी व्यावसायिक, सरकारी आणि खासगी वाहनांना लागू होते. एखादे वाहन 15 वर्षांपेक्षा जुने असेल, तर त्यावर हरित कराची (ग्रीन टॅक्स) तरतूद आहे. म्हणजे जर तुमच्याकडे एखादे व्यावसायिक वाहन असेल, तर तुम्हाला त्याची फिटनेस टेस्ट करावी लागेल. रस्ते करासोबत (रोड टॅक्स) तुम्हाला या वाहनासाठी हरित कर द्यावा लागेल. दुचाकी किंवा चारचाकी, कोणत्याही व्यावसायिक वाहनाला ग्रीन टॅक्सची तरतूद आहे. सरकारी वाहतूक वाहनांना 15 वर्षांनंतर भंगारात काढण्याची तरतूद आहे.

पॉलिसीचे कार मालकाला काय फायदे?

वाहनधारकांना जुने वाहन स्क्रॅप केल्यावर प्रमाणपत्र दिले जाणार आहे. हे प्रमाणपत्र दाखवून नवीन वाहन खरेदीवर 5 टक्के सूट मिळणार आहे. वाहन कंपन्या ही सवलत देतील. शिवाय नवीन वाहन खरेदी करणाऱ्यांना नोंदणी शुल्क भरावे लागणार नाही. नवीन वैयक्तिक वाहन खरेदीवर रोड टॅक्समध्ये 25% सूट मिळेल. जे व्यावसायिक वाहने खरेदी करतात त्यांना रोड टॅक्समध्ये 15% सूट मिळेल.

नवीन नियम कधी अंमलात येतील?

फिटनेस टेस्ट आणि स्क्रॅपिंग सेंटरशी संबंधित नियम 1 ऑक्टोबर 2021 पासून लागू होतील. सरकारी आणि सार्वजनिक उपक्रमांची 15 वर्षे जुनी वाहने भंगारात काढण्याचे नियम 1 एप्रिल 2022 पासून लागू होतील. व्यावसायिक वाहनांसाठी आवश्यक फिटनेस चाचणीशी संबंधित नियम 1 एप्रिल 2023 पासून लागू होतील. इतर वाहनांसाठी आवश्यक असलेल्या फिटनेस चाचणीशी संबंधित नियम 1 जून 2024 पासून टप्प्याटप्प्याने लागू होतील.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.