दुसऱ्याच्या कागदपत्रावर 24 वर्षे नोकरी केली, 43 लाख पगार घेतला, पण शेवटच्या टप्प्यात सापडला
मुंबई : दुसऱ्याची कागदपत्रे सादर करून मुंबई महापालिकेत 24 वर्षे नोकरी केलेल्या कर्मचाऱ्यास आझाद मैदान पोलिसांनी अटक केलीय. न्यायालयाकडून आरोपीला 20 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. रमेश मारूती शेलार असं 53 वर्षीय आरोपीचे नाव असून पालिकेने आतापर्यंत त्याला 43 लाख रुपये वेतन अदा केले आहेत.
दुसऱ्याच्या कागदपत्रावर 24 वर्षे नोकरी केली, 43 लाख पगार घेतला
रमेश मारुती शेलार हा 1989 मध्ये माळी म्हणून पालिकेत नोकरीला लागला होता. तेव्हा त्याने सोपान मारुती साबळे जो सध्या पालिकेच्या एफ दक्षिण विभागात मुकादम पदावर कार्यरत आहे त्या व्यक्तीची कागदपत्रे सोबत जोडली होती आणि सोपान साबळे याच नावाने पालिकेत वावरत होता. दोघांचेही नाव तेच, जन्मदिनांक तेच आणि शाळेचा दाखलाही सारखाच आढळल्याने पालिकेने याप्रकरणी २०१७ मध्ये चौकशी सुरू केली होती.
यावेळी चौकशी अधिका-याने दोघानांही ओरिजिनल कागदपत्रे सादर करण्यास सांगितली गेली. तेव्हा रमेश शेलार हा ओरिजिनिल कागदपत्रे सादर करू शकला नाही आणि त्यानंतर तो कामावर येण्यासही बंद झाला. संपूर्ण चौकशीनंतर पालिका प्रशासनाने त्याच्याविरोधात 15 जुलै 2021 रोजी पोलिसांत गुन्हा दाखल केला होता.
पोलिसांकडून अटक, न्यायालयाकडून पोलिस कोठडी
अखेर पोलिसांनी संपूर्ण माहिती घेतली असता आणि मिळालेल्या माहितीची पडताळणी केल्यानंतर आझाद मैदान पोलिसांनी दुसऱ्याच्या कागदपत्रावर मुंबई महापालिकेत 24 वर्षे नोकरी केलेल्या कर्मचाऱ्यास अटक केली आहे. न्यायालयाकडून आरोपीला 20 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.