Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शरद पवार सांभाळताहेत निष्क्रिय मुख्यमंत्र्यांची मर्जी, पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडून सरकार खुर्ची बचाव कार्यक्रमात व्यस्त

शरद पवार सांभाळताहेत निष्क्रिय मुख्यमंत्र्यांची मर्जी, पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडून सरकार खुर्ची बचाव कार्यक्रमात व्यस्त



मुंबई - गेल्या आठवड्यात कोकणातील चिपळूण, महाडसह इतर भागात आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात आलेला महापूर तसेच विविध ठिकाणी दरडी कोसळून झालेल्या दुर्घटना यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. मात्र या पूरस्थितीमध्ये सापडलेल्या लोकांच्या मदतीच्या मुद्द्यावरून भाजपा आमदार गोपिचंद पडळकर  यांनी महाविकास आघाडी सरकार आणि या सरकारचे निर्माते शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राज्यातील बहुतांश भागात पूरस्थिती असताना पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडून राज्यातील सरकार खुर्ची बचाव कार्यक्रमात व्यस्त आहे, असा टोला गोपिचंद पडळकर यांनी लगावला आहे. 

गोपीचंद पडळकर म्हणाले की, राज्यातील पूरग्रस्त जनतेला सरकारकडून मदतीची अपेक्षा असताना हे सरकार खुर्ची बचाव कार्यक्रमात व्यस्त आहे. तसेच या महाविकास आघाडी सरकारचे कर्तेधर्ते शरद पवार हे निष्क्रीय मुख्यमंत्र्यांची मर्जी सांभाळत आहेत. तसेच दौरे केले म्हणून आपल्याच पुतण्याला खडसावत आहेत, असा टोला पडळकर यांनी लगावला.

राज्यात कारखानदारांच्या भ्रष्टाचारामुळे बंद पडलेल्या, मोडकळीस आलेल्या कारखान्यांना वाचवण्यासाठी तिजोरीमधून ३८०० कोटींची तरतूद करण्यास हे सरकार मागेपुढे पाहत नाही. मात्र, पुराने उद्ध्वस्त झालेल्या कोकण, सातारा, कोल्हापूर, सांगली या भागांसाठी या सरकारला तिजोरी उघडता येत नाही. त्यांच्याकडे हे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. मागे पूर आला होता. तेव्हा फडणवीस सरकारने तातडीने मदत केली होती, आता आलेल्या पुरामुळे आधीपेक्षा वाईट परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत पूरग्रस्त शेतकरी, नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना कुठल्याही निकषात न अडकवता तातडीने प्रत्येकी १ लाख रुपयांची मदत करण्यात यावी. तसेच व्यापाऱ्यांना पुढील दोन वर्षांसाठी घरपट्टी, पाणीपट्टी आणि वीजबील माफ करण्यात यावे, अशी मागणी पडळकर यांनी केली.

 पूर ओसरल्यानंतर या भागांमध्ये नेतेमंडळींचे दौरे सुरू झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी नेतेमंडळींच्या दौऱ्यांमुळे प्रशासनावरील ताण वाढतो. त्यामुळे नेतेमंडळींनी अशा भागातील दौरे टाळावेत, असा सल्ला दिला होता. त्यावरूनही गोपिचंद पडळकर यांनी पवारांवर टीका केली आहे. दौरे केले म्हणून शरद पवार आपल्याच पुतण्याची कानउघाडणी करत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.