Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शरद पवारांचं आवाहन : ज्यांचा संबंध नाही त्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा टाळा.

 शरद पवारांचं आवाहन : ज्यांचा संबंध नाही त्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा टाळा.


मुंबई: राज्यात जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा मदतकार्य होणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे कोणत्याही नेत्यानं प्रसंगावधान राखलं पाहिजे. अशा प्रकारचे दौरे केल्याने यंत्रणा त्यांच्यासाठी फिरवावी लागते. ते योग्य नाही. त्यामुळे ज्यांचा या भागाशी दैनंदिन संबंध नाही त्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा टाळावा, असं आवाहन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं आहे. 

राज्यातील पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन हे आवाहन केलं. तसेच नैसर्गिक आपत्तीत त्या भागाचा दौरा केल्यावर सर्व यंत्रणा नेत्यासाठी फिरवावी लागते. त्यामुळे कामात अडथळा येतो. म्हणून आपण पूरग्रस्त भागाची पाहणी करायला गेलो नाही, असं पवारांनी सांगितलं. कोणत्याही नेत्यांनी प्रसंगावधान राखावं. मी सुद्धा आता दौऱ्यावर जात नाही. त्याचं कारण बाकीची यंत्रणा फिरवावी लागते. आपल्या भोवती यंत्रणा ठेवणं योग्य नाही. दौरे होत आहेत त्याने धीर मिळतो. पण दौऱ्यामुळं शासकीय यंत्रणेचं काम वाढतं. त्यामुळं दौरे होऊ नये असं मला वाटतं. दौऱ्याला गेल्यामुळं यंत्रणेला त्रास होतो. त्यामुळे ज्यांचा या भागाशी दैनंदिन संबंध नाही, त्यांनी या भागांचा दौरा टाळावा. ठिक आहे‌ राज्यपाल जात आहेत. त्यांचे केंद्राचे संबंध‌ चांगले आहेत‌. ते‌ जास्त मदत आणू शकतात, असंही ते म्हणाले.

आणि पंतप्रधानांनी विनंती मान्य केली

माझा पूर्वीचा अनुभव, विशेषत: लातूरच्या वेळचा अनुभव आहे. अशा घटनानंतर अनेक लोक गाड्या घेऊन त्या ठिकाणी जातात. माझं आवाहन आहे, आता शासकीय यंत्रणा पुनर्वसनाच्या कामात व्यस्त आहेत. त्यांचे लक्ष विचलित होईल, त्यामुळे असे दौरे टाळावे. मी लातूरला असताना आम्ही सगळे जण कामात होतो, पंतप्रधान येत होते. त्यावेळी मी पंतप्रधानांना सांगितलं दहा दिवस येऊ नका. तुम्ही आला तर यंत्रणा तिकडे लावावी लागेल. पंतप्रधानांनी माझी ही विनंती मान्य केली. त्यानंतर ते दहा दिवसाने लातूरला आले होते, असा अनुभवही पवारांनी सांगितला.

सहा जिल्ह्यांना सर्वाधिक फटका

राज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये आलेल्या पूरामुळे शेतकरी, कष्टकरी, उद्योजकांचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र, त्यात सहा जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झालं आहे. एकूण 16 हजार कुटुंबाला त्याचा फटका बसला आहे. कोकणात घरांचं नुकसान झालंय. इतर ठिकाणी शेतीचं नुकसान झालंय. माती वाहून गेलंय. सहा जिल्ह्यांमध्ये अधिक नुकसान झालं आहे. राज्य सरकार त्यांच्या कार्यक्रमानुसार मदत करेल. काही तातडीची मदत राज्य सरकारकडून मिळणार आहे. आढाव्यानंतर राज्य सरकार आणखी मदत जाहीर करेल अशी खात्री आहे, असंही ते म्हणाले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.