Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

निवारा केंद्रातील व्यक्तींची प्राथमिक आरोग्य तपासणी करा कोरोना संशयीतांची तातडीने कोरोना चाचणी करा -जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

निवारा केंद्रातील व्यक्तींची प्राथमिक आरोग्य तपासणी करा कोरोना संशयीतांची तातडीने कोरोना चाचणी करा -जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी


सांगली, दि. 24, : पूरग्रस्तांसाठी निर्माण करण्यात आलेल्या निवारा केंद्रामध्ये दाखल होणाऱ्या प्रत्येक व्यक्तींची प्राथमिक आरोग्य तपासणी करावी. तसेच एखादी व्यक्ती कोरोना संशयीत वाटल्यास त्यांची तातडीने ॲन्टीजेन टेस्ट करून पॉझिटीव्ह आढळल्यास तातडीने कोरोना सेंटरमध्ये दाखल करावे. तसेच त्यांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींचीही कोरोना चाचणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.

विलिंग्डन कॉलेज व मालू हायस्कूल सांगली येथे सुरू करण्यात आलेल्या पूरग्रस्त निवारा केंद्रांना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज भेट देवून पाहणी केली. यावेळी प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी विशाल नरवाडे, प्रातांधिकारी समिर शिंगटे, मिरज तहसिलदार डी. एस. कुंभार, तासगाव तहसिलदार कल्पना ढवळे, अप्पर तहसिलदार अर्चना पाटील आदि उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, निवारा केंद्रामध्ये दाखल होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला चांगल्या दर्जाचे जेवण पुरविण्याबरोबरच शुध्द पाणीपुरवठा करावा. रात्रीच्या वेळी त्यांच्या निवाऱ्याची सोय आहे किंवा नाही याची खातरजमा केंद्र प्रमुखांनी स्वत: करावी. निवारा केंद्रामध्ये कोणत्याही प्रकारच्या सुविधा अपुऱ्या पडू नयेत याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. या सुविधांसाठी लागणारा निधी तातडीने उपलब्ध करून दिला जाईल. ज्या ज्या वेळी निधीची आवश्यकता पडेल तसतसे प्रशासनास कळविण्यात येवून निधीची मागणी विहीत कालावधीत करावी. सुविधा केंद्रांच्या ठिकाणी लाईट, प्रसाधनगृहे अशा अत्यावश्यक सेवा प्राधान्याने देण्यात याव्यात. त्याचबरोबर स्वच्छताही ठेवण्यात यावी. हा परिसर सॅनिटाईझ करावा. निवारा केंद्रात नेमलेल्या अधिकाऱ्यांनी दाखल व्यक्तींना मास्क, सॅनिटायझर उपलब्ध करून द्यावेत. मास्क वापरण्याची सक्ती करण्यात यावी. या कामांमध्ये जे अधिकारी, कर्मचारी हलगर्जीपणा करतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

विलिंग्डन महाविद्यालय येथे सुरू करण्यात आलेल्या निवारा केंद्रात 118 व्यक्ती तर मालू हायस्कूलमध्ये 75 व्यक्ती दाखल आहेत. पूरग्रस्तांची संख्या वाढली तरीही त्यांची सोय व्हावी यासाठी आत्ताच जागा निश्चित करून ठेवावी. तसेच शहरी भागातील निवारा केंद्रांना ज्या प्रकारे सुविधा पुरविण्यात येत आहेत त्याचपध्दतीने ग्रामीण भागातील निवारा केंद्रांनाही सुविधा पुरवाव्यात, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी यावेळी दिले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.