Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

देशात ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू नाही; केंद्र सरकारचे संसदेत अजब उत्तर

 देशात ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू नाही; केंद्र सरकारचे संसदेत अजब उत्तर


नवी दिल्ली : देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजन च्या अभावी कोणाचाही मृत्यू झाला नाही असा अहवाल राज्यांनी आणि केंद्र शासित प्रदेशांनी दिला असल्याचं केंद्र सरकारने संसदेत जाहीर केलं. मंगळवारी संसदेत विरोधी पक्षांने विचारलेल्या एका प्रश्नावर उत्तर देताना केंद्र सरकारने हे स्पष्ट केलं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजन च्या मागणीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचंही केंद्र सरकारने सांगितलं. केंद्र सरकारच्या या उत्तरावर आता सर्व स्तरातून टीका होताना दिसत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनच्या अभावी रुग्ण रस्त्यांवर आणि रुग्णालयात मृत पावले का असा प्रश्न काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांनी संसदेतील प्रश्नोत्तराच्या तासाला विचारला. त्यावर उत्तर देताना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी या प्रश्नाला लिखित स्वरुपात उत्तर देताना सांगितलं की, "आरोग्य हा राज्यांच्या अख्यत्यारितील विषय आहे. केंद्राने सर्व राज्यांना आणि केंद्र शासित प्रदेशांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये झालेल्या मृतांच्या आकडेवारीची माहिती देण्यासाठी सांगितलं होतं. त्यामध्ये ऑक्सिजन च्या अभावी रुग्ण मृत पावला असं कोणत्याही राज्याच्या आणि केंद्र शासित प्रदेशाच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आलं नाही."

कोरोनाच्या पहिल्या लाटेत ऑक्सिजनची मागणी ही 3095 मेट्रिक टन इतकी होती. ती दुसऱ्या लाटेत 9000 मेट्रिक टन इतकी झाल्याचं केंद्र सरकारने सांगितलं. ऑक्सिजन अभावी देशात एकही मृत्यू झाला नाही या केंद्र सरकारच्या उत्तरावर विरोधी पक्षांनी सडकून टीका केली आहे. ऑक्सिजन अभावी देशात हजारो मृत्यू झाले असून ज्या लोकांनी आपल्या कुटुंबातील सदस्य गमावला आहे त्यांनी केंद्र सरकारवर खटला दाखल करावा असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संपूर्ण देशात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याचं चित्र होतं. त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. अनेकांना तर हॉस्पिटलमध्ये बेडही उपलब्ध होऊ शकले नाहीत, त्यांनी रस्त्यावरच आपला जीव सोडला. असं असताना केंद्र सरकार म्हणतंय की ऑक्सिजन अभावी देशात एकही मृत्यू झाला नाही.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.