लस घेताच 40 कोटींहून अधिक लोक हे कोरोनाविरुद्धच्या लढाईत बाहुबली बनले
नवी दिल्ली - संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून प्रारंभ होत आहे. सभागृहाचे कामकाज विनाअडथळा पार पडण्यासाठी विरोधी पक्षांनी सहकार्य करावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. आमची सर्व विषयांवर चर्चा करण्याची तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र महागाई, इंधन दरवाढीचा फटका, राज्यांना लस मिळत नसणे, शेतकरी विरोधी कायदे आदी विषयांवर विरोधकांनी संसद अधिवेशनात आवाज उठविण्याचे ठरविले आहे. त्यामुळे संसदेचे कामकाज वादळी ठरणार आहे. याच दरम्यान पावसाळी अधिवेशन सुरू होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
नरेंद्र मोदी यांनी "विरोधी पक्षातील नेत्यांनी परखड प्रश्न विचारावेत पण सरकारला शांत वातावरणात उत्तर देण्याची संधी देखील द्यावी जेणेकरून सर्वसामान्य जनतेपर्यंत सरकारचा आवाज पोहचू शकेल" असं म्हटलं आहे. तसेच कोरोनाविरोधातील लढाईत आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे असं आवाहन देखील केलं आहे. कोरोना लस घेताच कोरोनाविरोधातील लढाईत आपण बाहुबली बनतो असं सांगत लस घेण्याचं विशेष आवाहन त्यांनी देशातील नागरिकांना केलं आहे. तसेच आतापर्यंत 40 कोटींहून अधिक लोक हे कोरोना विरुद्धच्या लढाईत बाहुबली झाले आहेत असं देखील म्हटलं आहे.
"मी आशा करत आहे की तुम्ही सगळ्यांनी लसींचा कमीत कमी एक डोस घेतला असेल. तरीही तुम्ही कोरोनाच्या प्रोटोकॉलचे पालन करा. लस ही हातावर (दंडावर) देण्यात येते आणि जेव्हा लस हातावर देण्यात येते तेव्हा तुम्ही बाहुबली बनता. आतापर्यंत 40 कोटींपेक्षा जास्त लोकं कोरोनाविरुद्धच्या लढाईत बाहुबली बनले आहेत. पुढे ही हे काम जोरात सुरू राहिल" असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.
"कोरोनाच्या महाभयंकर साथीने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. त्यामुळेच आम्हाला वाटतं की या साथीच्या संदर्भात संसदेत अर्थपूर्ण चर्चा व्हायला हवी. तसेच विरोधकांकडून याबाबत जे काही पर्याय, सल्ले देण्यात येतील त्यामुळे कोरोनाची लढाई अधिक वेगाने लढता येईल. कोरोनावर चर्चा केली गेली पाहिजे. देशाच्या जनतेला उत्तर हवं आहे, ते उत्तर देण्यासाठी सरकारची तयारी आहे." असं देखील नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात यावेळी सरकार आणि विरोधीपक्षामध्ये खडाजंगी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.