कोरोनाची तिसरी लाट टाळण्यासाठी योग्य वर्तन आवश्यक - आरोग्य सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे
सांगली, दि. 15, : कोविड-19 सारख्या अत्यंत भयावह अशा महामारीला आपण तोंड देत आहोत. महामारीची तिसरी लाट येणार की नाही हे संपूर्णत: आपल्यावरच अवलंबून आहे. कोविड-19 ला प्रतिबंध करण्यासाठी योग्य वर्तन ठेवल्यास आपण तिसरी लाट रोखू शकू अन्यथा तिसरी लाट सप्टेंबर - ऑक्टोंबर महिन्यामध्ये अटळ आहे. माणसाचा जीव वाचविणे हीच सर्वांची प्राथमिकता असून त्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबी कठोरपणे करा. जास्तीत जास्त चाचण्या, ट्रेसिंग, लसीकरण आणि योग्य वर्तन या आधारे रूग्णसंख्या नियंत्रित करणे शक्य असून सद्याचा हा काळ शांततेचा काळ आहे. आपल्या जिल्ह्यात सर्वात जास्त रूग्णसंख्या किती होती हे लक्षात घेवून ऑक्सिजन, स्टिरॉईड, अनुषंगिक औषधे यांचा बफर स्टॉक ठेवा, असा सल्ला राज्याचे आरोग्य सल्लागार व माजी आरोग्य संचालक डॉ. सुभाष साळुंखे यांनी दिला.
राज्यात अनेक ठिकाणी रूग्णसंख्या कमी होत असताना सांगली जिल्ह्यात रूग्णसंख्या स्थीर राहिली आहे. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करूनही रूग्णसंख्या कमी होत नाही. यामुळे चिंता वाढली असून स्थिती नियंत्रणात न आल्यास तिसरी लाट अटळ आहे. या अनुषंगाने कोरोना प्रादुर्भावाची पाहणी करण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाचे सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे हे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासन व संबंधित सर्व यंत्रणा यांची बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे व विविध तालुक्यातील तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
संपूर्ण जग कोरोनासारख्या महामारीला सामोरे जात आहे. या स्थितीला तोंड देण्यासाठी आरोग्य यंत्रणा, प्रशासन यांना सर्व घटकांनी सहकार्य करणे ही बाब एैच्छिक नसून ती बंधनकारकच आहे, हे सर्वांनी लक्षात घेणे आवश्यक आहे, असे सांगून डॉ. सुभाष साळुंखे म्हणाले, जिल्ह्यात आरोग्याच्या पायाभूत सुविधा चांगल्या आहेत. संवाद यंत्रणा चांगली आहे. लोकांचा आरोग्य यंत्रणेबरोबरचा संपर्क चांगला आहे. कोविड कंट्रोल रूमची संकल्पनाही अत्यंत चांगल्या पध्दतीने राबविली जात आहे. यामधून उपलब्ध होणारा डाटा अतिशय महत्वपूर्ण ठरत आहे. त्याबरोबरच क्रीडा संकुल येथील कोविड सेंटर हे देखील उत्तम पध्दतीने कार्यरत आहे. या सर्व बाबी चांगल्या असल्या तरी जिल्ह्यातील कोरोना वाढीचा दर स्थीर असणे, रूग्णसंख्येत घट न होणे हे विषय अत्यंत चिंतेचे आहेत. लोकांची कोविड बद्दलची भिती कमी झाली असून कोविड प्रतिबंधासाठी आवश्यक योग्य वर्तन प्रतिसाद कमी झाला आहे. होमआयसोलेशनच्या आग्रहामुळे सांगली जिल्ह्यात रूग्णसंख्या कमी झाली नाही. त्यामुळे होमआयसोलेशन ऐवजी कम्युनिटी आयसोलेशन, संस्थात्मक विलगीकरण यावर भर देणे अनिवार्य आहे.
राज्याच्या तुलनेत सांगली जिल्ह्याचा टेस्टिंग दर चांगला आहे. ही बाब चांगली असली तरी खाजगी लॅबमधील टेस्टींग आणि त्यांचे रिपोर्टींग यांच्यावर नियंत्रण असणे आवश्यक आहे, असे सांगून डॉ. सुभाष साळुंखे म्हणाले, खाजगी रूग्णालयातून होणाऱ्या एचआरसीटी चाचण्यावरही अंकुश ठेवणे आवश्यक आहे. कंटेनमेंट झोनची अंमलबजावणी पहिल्या टप्प्यात अत्यंत प्रभावी झाली होती. पण दुसऱ्या टप्प्यात प्रभावहीन झाली आहे. त्यामुळे यापुढे कंटेनमेट झोनची अंमलबजावणी काटेकोरपणे झालीच पाहिजे यासाठी कटाक्ष ठेवावा. त्यासाठी पोलीस, महसूल प्रशासन, ग्राम दक्षता समिती यांनी अधिक प्रभावीपणे जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे. तसे झाले तरच रूग्णसंख्या कमी होवू शकेल. ग्राम दक्षता समितीने जे सुपर स्प्रेडर आहेत अशा लोकांना शोधून त्यांचे तातडीने लसीकरण करणे आवश्यक आहे.
शहरी भागात लोकसंख्येची घनता जास्त असल्याने रूग्णसंख्या व रूग्णसंख्या वाढीचा दरही जास्त आहे. अशा स्थितीत रूग्णासंख्या वाढीला जेवढी तालुका आरोग्य यंत्रणा जबाबदार आहे तितकीच नगरपालिका व महानगरपालिकांची यंत्रणाही जबाबदार आहे. रूग्णांमध्ये कोविड प्रादुर्भावाचा कालावधी वाढत आहे. अशावेळी रूग्ण किती दिवस उपचाराखाली राहिला याचा डाटा संग्राह्य ठेवून कोमॉर्बिड रूग्णांवर सतत निरीक्षण ठेवा. ऑक्सिजन, कॉन्सट्रेटर, व्हेंटीलेटर अनुषंगिक औषधे, साहित्य, पुरेसे मनुष्यबळ यांचे काटेकोर नियोजन ठेवणे तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने अनिवार्य असल्याचे डॉ. सुभाष साळुंखे यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, आरोग्य विभाग व सर्व संबंधित यंत्रणांनी पहिल्या लाटेत अत्यंत चांगले काम केले. त्याचप्रमाणे तिसरी लाट रोखण्यासाठी एक महिनाभर पुन्हा खूप मेहनत घेणे आवश्यक आहे. कोणत्याही स्थितीत टेस्टींग कमी होवू नये. आरटीपीसीआरची स्वॅब टेस्ट ही वाढवावी. नागरी भागातील टेस्टींग कमी होवू नये यासाठी दक्षता घ्यावी. खाजगी रूग्णालयांना भेटी देवून त्यांचे रिपोर्टींग व्यवस्थित होते किंवा नाही यावर लक्ष ठेवावे. जी रूग्णालये रिपोर्टींग करणार नाहीत त्यांच्यावर प्रसंगी कठोर कारवाई करावी. लक्षणे आढळणाऱ्या रूग्णांची तातडीने कोविड चाचणी करावी असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी व जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम यांनी याबाबत अनुषंगिक सूचना दिल्या.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.