Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत शिवसेनेचं तळ्यात-मळ्यात, मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे लक्ष

 विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत शिवसेनेचं तळ्यात-मळ्यात, मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे लक्ष

मुंबई, 04 जुलै: पावसाळी अधिवेशनाला  उद्यापासून सुरुवात होणार आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार की नाही, याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत फार अनुकुल नसल्याची माहिती समोर आली आहे. तर काँग्रेसचे प्रभारी एच.के.पाटील यांचा दौरा सुद्धा रद्द झाला आहे.

विधानसभेचे अध्यक्षपद गेल्या चार महिन्यांपासून रिक्त आहे. त्यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक घ्यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. तसंच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सुद्धा राज्य सरकारला पत्र पाठवून निर्णय घेण्याची सुचना केली आहे. परंतु, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घ्यायची की नाही याचा निर्णय आज होणार आहे.

संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. त्यात अध्यक्षपदाची निवडवणूक निर्णय अंतिम घेतला जाईल अशी माहिती मिळतेय. तुर्तास सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अध्यक्षपदाची निवडणूक यावर अद्याप फार अनुकूल नाही. अर्थात काँग्रेस पक्ष किती आग्रही राहते यावर निवडणुकीचा निर्णय अवलंबून राहील. काँग्रेस प्रभारी एच के पाटील यांचा ही मुंबई दौरा रद्द झाला आहे. ते दूरध्वनीवरून संपर्कात आहेत.

आज कॅबिनेट बैठकीला किती आमदारांची कोरोना टेस्ट निगेटीव्ह येते यावर महाविकास आघाडीचे नेते निर्णय घेणार आहेत. आमदारांची आकडेवारी पाहूनच मुख्यमंत्री ठाकरे त्यानंतर राज्यपाल यांना विधानसभा अध्यक्षपद कार्यक्रम घ्यावे, असे पत्र पाठवतील. जर आमदार पॉझिटीव्ह असतील तर मात्र निवडणूक घेण्यात येऊ नये, असा सूर राहील. निवडणूक पत्र जर मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यपाल यांना पाठवले तरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल.

आजच्या कॅबिनेट बैठकीत येत्या दोन दिवसाच्या अधिवेशनात नेमके कोणती विधेयक मांडले जाणार याची माहिती दिली जाईल. कोरोना कारण देत चहापान यंदा होणार नाही पण कॅबिनेट बैठकीनंतर महाविकास आघाडी नेते पत्रकार परिषदेत बोलण्याची शक्यता आहे.

भाजपला देणार शह?

दरम्यान, महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची बैठक पार पडली. या बैठकीत भाजपचे विरोक्षी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती. त्यांच्या भेटीनंतर राज्यपालांनी विधानसभा अध्यक्षपद भरण्यात यावे, असं पत्र ठाकरे सरकारला पाठवले होते. पण, राज्यपाल भाजपची मागणी लावून धरत दबाव आणत आहे. त्यामुळे राज्यपालांचा हा निर्णय डावलण्यात यावा, असा निर्णय या समन्वय समितीच्या बैठकीत झाल्याची माहिती समोर आली आहे.

नाना पटोले यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे विधानसभेचे अध्यक्षपद रिक्त झाले आहे. दोन अधिवेशन झाल्यानंतर सुद्धा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळी राज्यपालांनी सरकाराला पत्र लिहून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घ्यावी, अशी आठवण करून दिली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा फडणवीस यांच्या भेटीनंतर राज्यपालांनी ठाकरे सरकारला पत्र लिहिले होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.