विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार; आता पवारांचाही निर्वाळा
बारामती: गेल्या काही दिवसांपासून विधानसभेच्या अध्यक्षपदावरून महाविकासआघाडीतील पक्षांमध्ये सुरु असलेल्या रस्सीखेचीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महत्वपूर्ण वक्तव्य केले आहे. विधानसभेचे अध्यक्षपद हे काँग्रेस पक्षाकडेच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. ते रविवारी बारामतीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा तिढा निकालात काढला. आमचा तीन पक्षांचा निर्णय स्वच्छ झालाय, विधानसभेचे अध्यक्षपद हे काँग्रेसकडे राहील. त्यामुळे कुणीही काही बोलायचा संबध नाही. तिन्ही पक्षांनाही काँग्रेसचा अध्यक्ष मान्य आहे, त्या निर्णयावर कायम आहोत, असे शरद पवार यांनी सांगितले.
यावेळी शरद पवार यांनी देशभरात समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात सावधपणे भाष्य केले. केंद्र सरकार याबाबत निर्णय घेत नाही, तोपर्यंत यावर भाष्य करणं योग्य राहणार नाही. निर्णय घेण्याचा अधिकार हा केंद्र सरकारचा आहे, केंद्र सरकार काय करतय यावर आमचं लक्ष आहे, असे शरद पवार यांनी म्हटले.
‘स्वबळाची भाषा करण्यात काहीही गैर नाही’
महाविकासआघाडीतील पक्षांनी स्वबळाची भाषा करण्यात काहीही गैर नाही, असे शरद पवार यांनी म्हटले. प्रत्येकजण आपला राजकीय पक्ष मोठा करण्याचा प्रयत्न करणार की नाही? त्यामुळे ते आपलं बळ वाढवण्याचा प्रयत्नात असणार. आम्ही सरकार एकत्र चालवतो, याचा अर्थ आम्ही पक्ष एकत्रित चालवत नाही. पक्ष आम्ही प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने चालवतो. प्रत्येकाला आपल्या पक्षाची व्याप्ती वाढावी अशी इच्छा असणार.. यात काहीही चुकीचे नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.