Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर त्याचे अधिक दुष्परिणाम का होतात?

लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर त्याचे अधिक दुष्परिणाम का होतात? 



नवी दिल्ली, 14 जुलै : कोणतीही लस घेतल्यानंतर ताप, अंगदुखी असे काही सौम्य दुष्परिणाम  दिसून येतात. कोरोना विषाणूपासून बचाव करणाऱ्या लसीबाबतही  हेच घडत आहे. मात्र पहिल्या डोसऐवजी  दुसरा डोस  घेतल्यानंतर लोकांना अधिक त्रास होत असल्याचं दिसत आहे. अनेक लोकांना पहिला डोस घेतल्यानंतर काहीही त्रास जाणवला नाही, त्यांना दुसरा डोस घेतल्यानंतर मात्र एक किंवा दोन दिवस ताप  आल्याचं किंवा अंगदुखीचा त्रास झाल्याचं दिसून आलं आहे. एकाच लसीचे दोन डोस घेतल्यानंतर या दोन्हीच्या दुष्परिणामांमध्ये फरक असण्यामागे नेमकं काय कारण आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पेशींच्या स्मृतीवर परिणाम होतो -

लस आपल्या शरीरात जाते तेव्हा पेशी  तिला ओळखतात. लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर शरीरात अँटीबॉडीज  तयार होण्यास सुरुवात होते. त्यानंतर दुसरा डोस विशेष प्रकारे कार्य करतो, ज्याला इम्युनोलॉजिकल मेमरी  म्हणतात. म्हणजे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीला शरीरात आधी दिलेली लस आठवते. अशा परिस्थितीत, विशिष्ट वेळेनंतर लसीच्या दुसऱ्या डोसची सुरुवात झाल्याने रोगप्रतिकारक शक्ती सतर्क होते आणि ती तीव्र प्रतिक्रिया देते. त्यामुळे अनेक लोकांना दुसरा डोस घेतल्यानंतर अधिक त्रास होतो.

वेगळा फॉर्म्युला हेदेखील एक कारण -

कोरोनाचा विषाणू नवा आहे, त्यामुळे त्याची लसदेखील नवीन आहे. परिणामी आपलं शरीर त्याला अधिक तीव्रतेने प्रतिसाद देत असल्याने असे दुष्परिणाम दिसत आहेत, असं मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केलं आहे. तसंच ही लस वेगवेगळ्या फॉर्म्युल्याने तयार करण्यात आली आहे. केवळ कोरोना लसच नाही, तर वेगवेगळ्या फॉर्म्युल्यावर काम करणाऱ्या लसींच्याही वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिसू लागल्या आहेत.

प्रत्येकावर लसीचा वेगळा परिणाम -

सर्वांची रोगप्रतिकारक शक्ती सारखी नसते. त्यामुळे प्रत्येकाची रोग प्रतिकारक शक्ती वेगवेगळ्या पद्धतीने कार्य करते. एकच रोग दोन लोकांना झाला, तरी प्रत्येकावरील त्याचा परिणाम वेगळा असतो. तसंच लसीबाबतही घडतं. आपल्या शरीरातील विविध हार्मोन्सचा प्रभाव लसीवर होतो. त्यामुळे लस घेतल्यानंतर पुरुषांपेक्षा महिलांमध्ये त्रास होण्याचं प्रमाण जास्त असल्याचं दिसत आहे.

संसर्ग झालेल्या लोकांमध्ये अधिक दुष्परिणाम -

ज्या लोकांना पूर्वी कोरोना झाला होता त्यांना लस घेतल्यानंतर अधिक त्रास झाल्याचा निष्कर्षही काही अभ्यासांमधून पुढे आला आहे. मात्र ज्यांना कोरोनाची लागण झालेली नव्हती, अशा लोकांनी लस घेतल्यानंतर त्यांच्यामध्ये त्रास होण्याचं प्रमाण कमी होतं. आधी कोरोना झालेल्या लोकांमध्ये अँटीबॉडीज आधीच अस्तित्वात आहेत. त्यामुळे त्यांनी या लसीचा पहिला डोस लस घेतल्यानंतर इम्यूनोलॉजिकल मेमरी शरीरात सक्रिय होते आणि काही दुष्परिणाम दिसून येतात.

कोणते दुष्परिणाम दिसतात?

सौम्य ताप, अंगदुखी, लस दिलेल्या ठिकाणी वेदना, तहान, थकवा अशी लक्षणं दिसतात, मात्र हे दुष्परिणाम व्यक्तीगणिक वेगळे असू शकतात. काहींना जास्त त्रास होतो, तर काहींना काहीच होत नाही किंवा फारच कमी त्रास होतो. डोकेदुखी, उलटी किंवा मळमळ अशी लक्षणंदेखील दिसतात. हे त्रास सर्वसामान्य असले, तरी त्याची तीव्रता जास्त असेल तर त्वरित तज्ज्ञांशी संपर्क साधणं आवश्यक आहे.

दुसर्‍या डोससाठी काय पूर्वतयारी करावी?

लस घेण्यापूर्वी शरीर हायड्रेट करणं म्हणजे भरपूर पाणी पिणं आवश्यक आहे. शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे जास्त त्रास होतो. लस घेतल्यानंतर, एक दिवस पूर्ण विश्रांती  घ्यावी. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती अधिक तीव्र होईल अशी कामं करणं टाळा. यामुळे त्रास कमी होण्यास मदत होते. शांत झोप  घेणंही आवश्यक आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.