Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली मनपा प्रशासनाकडून रस्तेखोदाई नुकसानभरपाईत तब्बल १६ कोटींचा भ्रष्टाचार

 सांगली मनपा प्रशासनाकडून रस्तेखोदाई नुकसानभरपाईत तब्बल १६ कोटींचा भ्रष्टाचार

सांगली, दि. ४- सांगली शहरात भारत गॅस रिसोर्सेस लिमिडेट कंपनीने केलेल्या रस्ते खोदाईच्या नुकसानभरपाईत शासकीय दरामध्ये तफावत करून महापालिका प्रशासनाने मोठा गोलमाल केला आहे. जवळपास १६ कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्याची माहिती शिवसेनेचे कुपवाड शहरप्रमुख रूपेश मोकाशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सांगली महापालिका क्षेत्रात गेले काही दिवस गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. भारत गॅस रिसोर्सेस लिमिडेट कंपनीच्या वतीने हे काम सुरू आहे. या कामासाठी चांगल्या रस्त्यांची खोदाई करण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रातील रस्त्यांचे खोदकाम केल्यानंतर त्याची दुरुस्ती करण्याची जबाबदारी त्या कंपनीवर निश्चित करूनच विहित कामासाठी रस्ते खोदाईची परवानगी देण्यात येते. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने दुरुस्ती दर निश्चित केला आहे. या दरानुसार नुकसानभरपाई जमा करावी लागते.

सांगली महापालिकेनेही याच अटीवर भारत गॅस रिसोर्सेस कंपनीला रस्ते खोदाईला परवानगी दिली; परंतु भरपाई मात्र शासन निर्णयानुसार न घेता आपल्या मर्जीने घेतल्याची बाब माहिती आधिकाराच्या माध्यमातून समोर आली आहे. २४ कोटींच्या भरपाईपोटी अवघे ८ कोटी रुपये भरून घेतले आहेत. या प्रकरणात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप मोकाशी यांनी केला. या भ्रष्टाचार प्रकरणाची सर्वंकष चौकशी करावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्याचेही त्यांनी सांगितले. महापालिकेतील नगरसेवक याबाबत मूग गिळून गप्प आहेत, पण शिवसेना संबंधित कंपनीकडून भरपाई वसूल केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी शिवसेनेचे सांगली विधानसभा क्षेत्रप्रमुख नानासाहेब शिंदे, सांगली शहरप्रमुख महेंद्र चंडाळे, हरिभाऊ लेंगरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.