सरकारी नियमांच्या आधीन राहून चातुर्मासाचे पालन करावे
यावर्षी श्रावक चातुर्मास दि. १७ जुलै तर दि.२३ जुलै २०२१ पासून मुनिंचा चातुर्मास सुरू होतो आहे. चातुर्मासाचा कालावधी धर्मसाधनेसाठी अत्यंत उपयुक्त असा असतो. हा ज्ञान साधनेचा आणि उपासनेचा कालखंड असतो. या कालावधीत विविध पूजा विधाने, अष्टान्हिक पर्व, नोपी, षोडशकारण पर्व, पर्युषण पर्व, स्वाध्यायादी नियमित केले जातात. यासाठी मंदिरांच्या माध्यमातून श्रावक श्राविका एकत्र येत असतात.
परंतु गेल्यावर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असून तो अजूनही थांबलेला नाही, त्यामुळे धोका टळलेला नाही. सध्या कोरोना या व्याधीची दुसरी लाट सुरू आहे. ती काही प्रमाणात ओसरते आहे तथापि पुन्हा तिसरी लाट येईल, असे शास्त्रज्ञ इशारे देत आहेत. त्यामुळे सर्व श्रावक-श्राविकांना विनंती आहे, की आपण हा चातुर्मास, यातील वेगवेगळी व्रत वैकल्ये इ. करताना पूर्ण काळजीपूर्वक करावीत. मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर करावा, सुरक्षित अंतर ठेवावे. विनाकारण गर्दी / प्रवास करू नये. कोरोनासाठीच्या सर्व शासकीय नियमांचे पालन करून आत्मसाधना करीत असताना आपले आरोग्यही सांभाळावे.
महाराष्ट्रात अजूनही मंदिरे बंद आहेत, त्यामुळे आपण आपापल्या घरीच हा चातुर्मास मोठ्या भक्तिभावाने, धर्ममय वातावरणात देवपूजन, स्वाध्याय, जप-ध्यान, उपवास इ. माध्यमातून करावा. दूरचित्रवाणीवरील पूजा, अभिषेक पहावेत. पूज्य त्यागींची प्रवचने ऐकवित. चातुर्मासातील सर्व क्रियांचे पालन शासकीय नियमांच्या आधीन राहून, शासकीय यंत्रणा, मंदिर कमिटी व स्थानिक पंडित यांच्या मार्गदर्शनानुसारच विधीवत करावे, असे आवाहन दक्षिण भारत जैन सभेच्यावतीने चेअरमन श्री. रावसाहेब जि. पाटील यांनी केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.