तुमच्या फोनमध्ये ते काय वाचतात हे आम्हाला माहीत आहे; Pegasus हॅकिंगवरून राहुल गांधींचा टोला
नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी Pegasus सॉफ्टवेअर हॅकिंग प्रकरणावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. तुमच्या फोनमधील ते काय वाचत आहेत आम्हाला माहीत आहे, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. काही दिवसांपूर्वी Pegasus सॉफ्टवेअरद्वारे भारतातील पत्रकार आणि नेत्यांसह इतरांचे फोन टॅप करण्यात आल्याचा दावा आंतरराष्ट्रीय मीडियाने केला आहे. इस्रायलची एक कंपनी एनएसओ ग्रुपने हॅकिंग सॉफ्टवेअर Pegasusचा वापर करून अनेकांचे फोन टॅप केल्याचं उघड झालं आहे.
मीडिया रिपोर्टनुसार लीगल कम्युनिटीशी संबधित लोक, उद्योजक, सरकारी अधिकारी, वैज्ञानिक, कार्यकर्ते आणि इतरांचे नंबर या लिस्टमध्ये आहेत. या लिस्टमध्ये 300 हून अधिक भारतीयांचे मोबाईल नंबर असल्याचा दावा केला जात आहे.
संसदेत आवाज उठवणार
राज्यसभेत सीपीआय नेते बिनॉय विश्वम, राजद खासदार मनोज झा, आपचे खासदार संजय सिंहसहीत अनेक खासदारांनी या विषयावर चर्चा करण्याची राज्यसभेत मागणी केली आहे. आमची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आहे. त्यामुळे आम्ही हा मुद्दा संसदेत उचलून धरू, असं काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी सांगितलं.
पेगासस सॉफ्टवेअर कसं काम करतं?
पेगासस एक मेलवेअर असून त्याद्वारे आयफोन आणि अँड्रॉईड डिव्हाईस हॅक करता येतं. मेलवेअर पाठवणारा व्यक्ती मोबाईलमधील मेसेज, फोटो आणि ई-मेल पाहू शकतो. एवढंच नव्हे तर त्या फोनवर येत असलेल्या कॉलचं रेकॉर्डिंगही करू शकतो. या सॉफ्टवेअरद्वारे फोनच्या माईकला गुप्तरित्या अॅक्टिव्ह केलं जातं.
केंद्र सरकारचं म्हणणं काय?
केंद्राकडून लोकांवर अशा पद्धतीने लक्ष ठेवण्यात येत असल्याचं वृत्त केंद्र सरकारने फेटाळून लावलं आहे. याबाबतचा कोणताही ठोस पुरावा किंवा आधार नाही. भारताची लोकशाही लवचिक आहे. देशातील नागरिकांचा गोपनियतेचा अधिकार हा मौलिक अधिकार म्हणून त्याचं सरकारडून संरक्षण केलं जात आहे, असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं.
दरम्यान, हा डेटा सर्वात आदी पॅरिसमधील मीडिया, एनएसओ फॉरबिडन स्टोरीज आणि अॅम्नेस्टी इंटरनॅशलनकडे लीक होऊन आला होता. त्यानंतर तो रिपोर्टिंग कन्सोर्टियमच्या रुपात वॉशिंग्टन पोस्ट, द गार्डियनसहीत 17 मीडियांसोबत शेअर करण्यात आला होता. लीक झालेल्या डेटामध्ये 50000 फोन नंबरची यादी आहे. 2016 पासून एनएसओकडून पेगासस सॉफ्टवेअरद्वारे या लोकांची हेरगिरी केली जात असल्याचं सांगितलं जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.