अभिनेते प्रवीण तरडेंचा हल्लाबोल;बकवास लोक आपल्या नशिबात आली आहेत, आपल्याला राजकीय सिस्टीम बदलली पाहिजे.
मुंबई/ पुणे: MPSC हे मायाजाल आहे असं म्हणत एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या एका तरुणानं पुण्यात आत्महत्या केली आहे. पुण्यातील फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या स्वप्नील लोणकर असं या २४ वर्षाच्या तरुणाचं नावं आहे. आत्महत्या करण्यापूर्वी स्वप्नीलने लिहिलेल्या सुसाईड नोटमधे आर्थिक परिस्थितीला कंटाळून आणि एमपीएससीची परीक्षा प्रक्रिया रखडल्याने आत्महत्या करत असल्याच म्हटलं आहे. एमपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरही २ वर्षे मुलाखत झालीच नाही आणि स्वप्निल हळूहळू नैराश्यात गेला. या काळात घरची परिस्थिती आणि परीक्षेनंतर नोकरी लागेल या आशेवर घेतलेलं कर्ज यासारख्या कारणांमुळेही स्वप्निलवरील तणाव वाढत गेल्याने त्यांने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.
स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येनंतर समाजातील सर्वच स्तरातून या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील बेधडक विचार मांडणारा अभिनेता प्रवीण तरडे यांनी देखील यावर आपलं मत व्यक्त केलं आहे. मी माझं स्वत:चं उदाहरण देतो १९९७ ते २००० साली सलग दोन वर्ष पेपर फुटत होते एमपीएसचे, आणि एमपीएसची पोरं काय तयारी करतात हे मला माहिती आहे. मेस लावाायची, मी देखील पुण्यातल्या एका मेसला होतो. कित्येकजण तर एक टाईमच जेवतात, आणि याच्यातूनच तयारी करतात, असं प्रवीण तरडे यांनी सांगितले.
एकवेळचं मेसचं जेवणं जेवायला ज्या पोरांकडे पैसे नसतात त्यांना जावून विचारा. परीक्षा जोपर्यंत आहे तोपर्यंतच पोरांच्या खिशात बजेट असतं. परीक्षा दोन दिवस जरी पुढे गेली ना. तरी इथे दोन दिवस उपाशी रहावं लागतं. कारण त्या पोरांची स्वप्न मोठी असतात. तुम्ही एकदा सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांना याबद्दल विचारलं पाहिजे. असे दिवस-रात्र अभ्यास करुन ते पुढे गेलेले आहेत. तुम्ही पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाशांना विचारलं पाहिजे ही मोठी नाव एमपीएसीसाठी झगडलेली आहेत. तेव्हा सव्वा चारशे रुपये भाडं असायचं मेसचं एका वेळचं. त्यामुळे ते भाडं देताना मेसच्या मावशीच्या हाता पाया पडावं लागायचं, असा अनुभव प्रवीण तरडे यांनी सांगितला.
या जगात फक्त राजकारण्यांनी जगायचं का? त्यांच्या पोरा-बायकांनी, त्यांच्या नातेवाईकांनी जगायचं? आणि सामान्य माणसांनी मरायचं... त्यामुळे आपण यांच्याबदद्ल गोड-गोड बोलणं बंद केलं पाहिजे. नाहीतर शेतकरी मरणार, एमपीएसी करणारे मरणार, कला क्षेत्रातली माणसं मरणार, मग जगणार कोण राजकरणासंबधातली लोकं?, असा सवालही प्रवीण तरडे यांनी उपस्थित केला आहे.
तुम्ही नक्की कशात व्यस्त आहात. सगळं योग्य चाललंय ना... हिवाळी अधिवेशन, उन्हाळी अधिवेशन चालू आहे. राजकारण्यांची लग्न व्यवस्थित होत आहे. मात्र तरुणांना नोकऱ्या द्यायला यांच्याकडे वेळ नाही. १३-१३ आमदारांच्या नोकऱ्या होण्यासाठी रोज राज्यपालांकडे जात आहे, असा निशाणा देखील प्रवीण तरडे यांनी साधला. आपल्याला इथली राजकीय सिस्टीम बदलली पाहिजे. इतकी बकवास लोक आपल्या नशिबात आलेली आहेत. कुणालाही कसलच ताळतंत्र नाहीये. स्वत:च्या राजकारणात ते रमलेले आहेत. सहा महिन्यांनी हा पक्ष त्या पक्षाशी युती करतोय. तो पक्ष त्या पक्षाशी युती करतोय. कार्यकर्ता याच्यासाठी भांडतोय, त्याच्यासाठी भांडतोय. एकमेकांची डोकी फोडतो. सगळे एका माळेचे मणी आहेत. मी कुठल्याही एका पक्षावर किंवा एका राजकारण्यावर टिका करत नाहीये. मी सगळ्यांवर टिका करतोय, असं परखड मत प्रवीण तरडे यांनी व्यक्त केलं आहे.
स्वप्निलची आई रडत होती, ते बघून डोळ्यात आलं -
स्वप्निल लोणकर आज त्याची आई ज्या पद्धतीने रडत होती . ते बघून डोळ्यात पाणी येत होतं. चार-चार वेळा मोबाईलवर ते पहाताना मोबाईल बंद केला. कारण तिथे स्वत:ची आई दिसायला लागली. स्वप्निल लोणकरच्या आईच्या डोळ्यात बघा. नक्की कोणाबद्दल आक्रोश आहे. मी सगळ्यांबद्दल बोलतोय सगळेच एका माळेचे मणी आहेत. सगळ्यांनी मिळून अशी परिस्थिती निर्माण केली आहे की, प्रत्येकाच्या मनात आत्महत्येचा विचार येईल.
आई-बाबांचा चेहरा एकदा डोळ्यासमोर आणा-
ते नवीन सत्ता नवीन मित्र करण्यासाठी गुंतलेत. त्यांच्या नातेवाईकांना राजकराणत आण्यासाठी गुंतलेले आहेत. तुम्ही कसलं त्यांना सपोर्ट करताय. तरुण मरतायेत. त्यामुळे बाबांनो आपल्या आई-बाबांचा चेहरा एकदा डोळ्यासमोर आणा. काही नाही गोठ्यामध्ये बांधलेल्या गुरांच्या डोळ्यात पाणी आलेलं असेलं. पण राजकारण्यांच्या डोळ्यात पाणी येणार नाही, लाज वाटली पाहिजे तुम्हाला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.