पेट्रोल परवडत नसेल तर सायकलचा वापर करा, पैसे कोणाच्याही घरात जात नाहीत
नवी दिल्ली : भाजी आणायला मंडईत जाताना सायकल वापरा, इंधनाच्या दरवाढीमुळे सामान्य माणसांना अजिबात फटका बसणार नाही. उलट वाढीव किमतीतून जो पैसा उपलब्ध होईल, तो गरिबांना मोफत अन्नधान्य देण्यासाठीच खर्च होईल, अशी वक्तव्ये विविध राज्यांतील भाजप नेते सध्या करत आहेत. काही राज्यांमध्ये पेट्रोलचे भाव प्रतिलीटर १०० रुपयांवर गेले किंवा त्याच्या जवळपास आहेत. पण, त्याबद्दल नाराजीचा एकही शब्द भाजप नेते काढताना दिसत नाहीत.
मध्य प्रदेशचे ऊर्जामंत्री प्रद्युम्नसिंग तोमर यांनी लोकांना असा अजब सल्ला दिला की, मंडईत भाजी आणायला जाताना सायकल वापरा. त्याने प्रकृतीही उत्तम राहील व प्रदूषणही होणार नाही. तेल दरवाढीतून जो पैसा मिळणार आहे, त्यातून गरीब लोकांना दिवाळीपर्यंत मोफत अन्नधान्य देण्यात येणार आहे. भाजपच्या नेत्यांनी याआधीही अशीच वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत.
फेब्रुवारी महिन्यात बिहारचे मंत्री व भाजप नेते नारायण प्रसाद म्हणाले होते की, इंधन तेलाच्या दरवाढीचा सामान्य माणसाला अजिबात फटका बसणार नाही. कारण, ते सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करतात. अगदी थोडेच लोक खासगी वाहनांचा वापर करतात. तेलाच्या वाढलेल्या किमतींची लोकांना सवय होईल. काही दिवसांपूर्वी केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले की, महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान या राज्यांत काँग्रेस सत्तेत आहे किंवा सत्ताधारी आघाडीत सामील आहे. त्या राज्यांतही पेट्रोल, डिझेलच्या किमती जास्त का आहेत, याचे उत्तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिले पाहिजे. त्यांना गरिबांची इतकी कणव आहे, तर मग महाराष्ट्रात इंधन तेलावरील कर कमी करण्यास राहुल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितले पाहिजे. कर्नाटक, मध्य प्रदेशमध्येही तेलाचे दर जास्त आहेत. त्याबाबत प्रधान यांनी मौन बाळगले.
पैसे कोणाच्याही घरात जात नाहीत
आंतरराष्ट्रीय स्तरावरील दरांनुसार देशात इंधन तेलाच्या दरात चढउतार होतात. तेलाच्या किमती वाढल्या तरी त्यातून मिळणारे पैसे कोणीही घरी घेऊन जात नाही, असे केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन म्हणाले होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.