फोन टॅपिंग प्रकरण: देशाच्या स्वातंत्र्याला धोका; पंतप्रधान, गृहमंत्र्यांनी खुलासा करावा - संजय राऊत
भारतातील ४० पेक्षा जास्त पत्रकारांवर पेगासस नामक सॉफ्टवेअर वापरून पाळत ठेवण्यात येत होती, याची पुष्टी फॉरेन्सिक तपासातून झाल्याचा दावा 'द वायर'सह जगभरातील १५ मीडिया संस्थांनी केला आहे. यावर शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना परदेशी कंपन्या अशा प्रकारे देशाच्या प्रमुख लोकांचे फोन ऐकत असतील तर या देशाच्या स्वातंत्र्याला सर्वात मोठा धोका आहे. यामुळे देशाच्या पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी याचा खुलासा करावा, अशी मागणी केली आहे.
संजय राऊत यांनी फोन टॅपिंग प्रकरणी माध्यमांशी संवाद साधताना महाराष्ट्रात मविआ सरकार बनत असताना फोन टॅपिंगचं प्रकरण घडलं होतं आणि त्याची चौकशी सुरु आहे, असं म्हणाले. नाना पटोले यांनी हे प्रकरण अधिवेशनात चर्चा घडवून आणली. सरकारने समिती नेमली आहे. महाराष्ट्रातील काही वरिष्ठ अधिकारी फोन टॅपिंग प्रकरणामध्ये होते, त्याची चौकशी सुरु आहे, असं राऊत म्हणाले.
"या प्रकरणात बरिचशी नावं समोर यायची आहेत. विशेषत: यावेळेला सर्वात जास्त नावं ज्यांचे फोन टॅपिंग झाले ते पत्रकार आहेत, संपादक आहे हे गंभीर आहे. गेल्या काही वर्षांपासून या देशात राजकारणी, पत्रकार, संपादक हे एका भीतीच्या सावटाखाली जगत आहेत. आपल्यावर पाळत ठेवली जात आहे, आपले फोन ऐकले जात आहेत, ही सगळ्यांच्या मनात भीती आहे. यावर देशाच्या पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी समोर येऊन त्यावर खुलासा करणं गरजेचं आहे," असं राऊत म्हणाले.
"परदेशी कंपन्या अशा प्रकारे देशाच्या प्रमुख लोकांचे फोन ऐकत असतील तर या देशाच्या स्वातंत्र्याला सर्वात मोठा धोका आहे. या देशाचं शासन आणि प्रशासन दुबळं असल्याचं लक्षण आहे. कोणही ऐरागैरा येतो आणि आमचे फोन टॅप करतो,
आमच्याकडे सायबर क्राईम संदर्भात कठोर नियम नाहीत, कायदे नाहीत. सरकारला ज्या पद्धतीने समोर येऊन या सगळ्या गोष्टींचा सामना करायला हवा ते दिसत नाहीत. यामुळे देशामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण आहे," असं संजय राऊत म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.