मुंबई-ठाण्यात खंडणीचा गुन्हा, परमबीर सिंह यांच्या पाच निकटवर्तीय पोलीस अधिकाऱ्यांची बदली
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या पाच निकटवर्तीय पोलीस अधिकाऱ्यांची एकाच वेळी बदली करण्यात आली आहे. दोन डीसीपी, दोन एसीपी आणि एका महिला पोलीस निरीक्षकाचा यामध्ये समावेश आहे. या सर्वांवर परमबीर सिंह यांच्यासोबत खंडणी प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप आहे.
कोणाकोणाची बदली ?
पोलिस उपायुक्त (डीसीपी) अकबर पठाण
पोलिस उपायुक्त (डीसीपी EOW) पराग मानारे
सहायक पोलिस आयुक्त (एसीपी) संजय पाटील
सहायक पोलिस आयुक्त (एसीपी) श्रीकांत शिंदे
पोलिस निरीक्षक आशा कोंरके
परमबीर सिंह यांच्यासह इतरांवर मुंबईत आणि ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मरिन ड्राईव्ह आणि कोपरी पोलिस स्टेशनमध्ये एकूण 2 एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणातील सर्व पाच अधिकाऱ्यांना स्थानिक शस्त्रास्त्र विभागात पाठवले गेले आहे. याला साईड पोस्टिंग विभाग देखील मानले जाते.
दरम्यान, परमबीर सिंह यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी मुंबई पोलिसांकडून विशेष तपास पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. त्याचे नेतृत्व डीसीपी निमित गोयल करतील. त्यांच्यासमवेत एसआयटीमध्ये एसीपी आणि अन्य पाच निरीक्षक दर्जाचे अधिकारी आहेत.
एसआयटीमध्ये कोणाकोणाचा समावेश
निमित गोयल, पोलीस उपायुक्त
एम एम मुजावर, सहाय्यक पोलीस आयुक्त
प्रिणम परब, पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा
सचिन पुराणिक, पोलीस निरीक्षक, खंडणी विरोधी पथक
विनय घोरपडे, पोलीस निरीक्षक
महेंद्र पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा
विशाल गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पश्चिम विभाग सायबर पोलीस ठाणे
काय आहे प्रकरण?
भाईंदर येथील विकासक (बिल्डर) श्याम सुंदर अग्रवाल यांनी मरीन ड्राईव्ह पोलिसात तक्रार केली होती. त्यानंतर परमबीर सिंह आणि मुंबई पोलीस दलातील पाच अधिकाऱ्यांविरुद्ध 15 कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मरीन ड्राईव्ह येथे नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यातील तक्रारदार श्यामसुंदर अग्रवाल यांच्या विरोधात मुंबईतील जुहू पोलीस स्टेशन येथे मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्याचा तपाससुद्धा याच एसआयटीकडून केला जाणार आहे.
शरद अग्रवाल यांचाही आरोप
दुसरीकडे, परमबीर सिंह यांनी दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप शरद अग्रवाल यांनी केला आहे. शरद अग्रवाल यांच्याकडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागून जमिनी बळजबरीने नावावर करण्यात आल्याच्या आरोपाखाली ठाणे शहरातील कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमबीर सिंह यांच्यासोबत संजय पुनामिया, सुनील जैन, मनोज घोटकर आणि डीसीपी पराग मणेरे असे सहआरोपी आहेत. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक फूलपगारे करत आहेत.
परमबीर सिंग आणि अनिल देशमुख प्रकरण
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिमहिना 100 कोटींची वसुली करण्याचे आदेश दिल्याचा आरोप करणारे पत्र मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लिहिले होते. देशमुख किंवा त्यांच्या कार्यालयातील कोणत्याही अधिकाऱ्याकडून कोणतेही गैरवर्तन किंवा गुन्हा झाल्याबाबत ही समिती चौकशी करणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.