ताई या धर्मयुद्धात तुम्हाला अश्वत्थामा बनवलं गेलंय, नरो वा कुंजरोवा होऊ देऊ नका
मुंबई - केंद्रातील मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर मुंडे भगिनी नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली होती. प्रीतम मुंडे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, प्रत्यक्षात तसे झाले नाही. त्यानंतर मुंडे समर्थक, कार्यकर्ते यांनी राजीनाम्याचा धडाका लावला. यानंतर पंकजा मुंडे यांनी समर्थकांची संवाद साधत त्यांना धीर दिला आणि राजीनामे नामंजूर करत असल्याचे स्पष्ट केले. पाच पांडव का जिंकले, कारण त्यांच्याकडे संयम होता. जो चांगला असतो, तो युद्ध टाळण्याचा प्रयत्न करतो. मी धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न तेव्हापर्यंत करते जेव्हापर्यंत शक्य आहे. आम्ही कुणालाच भीत नाही. मी कुणाचा निरादार करत नाही, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. यावरून आता राष्ट्रवादीने पंकजा यांना सल्ला दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी पंकजा मुंडे यांना सल्ला दिला असून "नरो वा कुंजरोवा होऊ देऊ नका" असं म्हटलं आहे. तसेच "ताई या धर्मयुद्धात तुम्हाला अश्वत्थामा बनवलं गेलंय" असं देखील त्यांनी म्हटलं आहे. अमोल मिटकरी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "ताईंनी आज कौरवांना चांगलंच झोडपलं. ताई तुमच्या पक्षात पंख छाटणारा शकुनी मा.मु. मोठा चतुर आहे हे विसरू नका. या धर्मयुद्धात तुम्हाला अश्वत्थामा बनवल्या गेलंय. मामु सोबत डोक्याला तेल लावलेले धर्मराज व पोरी पळवून नेणारे दुःशासन पण आहेत. "नरो वा कुंजरोवा" होऊ देऊ नका" असं मिटकरींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
"कोण कौरव, कोण पांडव हे त्यांनीच ठरवावं"; पंकजा मुंडेंना काँग्रेसचा टोला
काँग्रेसने पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यानंतर कोण कौरव, कोण पांडव हे त्यांनीच ठरवावे, असा टोला लगावला आहे. कौरव कोण, पांडव कोण हे त्यांचे त्यांनीच ठरवावे. त्यांची सेना, त्यांचेच कौरव, त्यांचेच पांडव, अंगणही त्यांचेच आणि महाभारतही तिकडचेच, ते त्यांनाच लखलाभ असो, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांचे कार्यकर्ते नाराज असल्यावरून गेल्या काही दिवसांपासून भाजपमधील वाद चव्हाट्यावर येत असल्याची चर्चा सुरू होती. अलीकडेच पंकजा मुंडे यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन त्यावर स्पष्टीकरणही दिले होते.
दरम्यान, केंद्रीय नेतृत्वावर विश्वास ठेवा. एक स्वल्पविराम द्या, मी तुमचा राजीनामा स्वीकारणार नाही, असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले. ला पुढेही खडतर मार्ग दिसतो आहे. योग्य निर्णय घेण्याची योग्य वेळ असते. आपण वारकरी आहोत, सात्विक आहोत. पंतप्रधान मोदींनी मला कधी अपमानित केले नाही. राष्ट्रीय अध्यक्षांनी अपमानित केले नाही, असेही पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.