कोरोना रूग्णांची संख्या जास्त असलेल्या भागात कंटेनमेंट झोनची प्रभावी अंमलबजावणी करा- जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील व्यक्तींची कोरोना चाचणी त्वरीत करा
सांगली, दि. 20, : ग्राम दक्षता समितीने होम आयसोलेशनमध्ये असलेल्या व्यक्ती घराबाहेर पडणार नाहीत तसेच गावांमध्ये गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. पोलीस प्रशासनेही याबाबत होम आयसोलेशनमधील व्यक्तींना नोटीस बजावून होम आयसोलेशनचे पालन योग्य प्रकारे होण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. कोरोना संसर्ग अधिक फैलावू नये व बाधित रूग्ण त्वरीत उपचाराखाली आणण्यासाठी कोरोना चाचणी मोठ्या प्रमाणात वाढविणे अत्यंत आवश्यक असून आरटीपीसीआर तपासणी वाढवावी. ज्या भागात कोरोना रूग्णांची संख्या जास्त आहे तेथे बॅरिकेटींग करून कंटेनमेंट झोन करून प्रभावी अंमलबजावणी करावी. त्या परिसरातील व हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील व्यक्तींची कोरोना चाचणी त्वरीत करावी, असे सक्त निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज खानापूर तालुक्यातील मंगरूळ व खंबाळे येथील कम्युनिटी आयसोलेशन सेंटर, प्राथमिक आरोग्य केंद्र विटा येथील डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, विटा येथील कोरोना चाचणी केंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्र खानापूर येथे प्रत्यक्ष भेट देवून पहाणी केली. तसेच तेथील कोरोना रूग्ण स्थितीचा व रूग्ण संख्या नियंत्रणात आणण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी उपविभागीय अधिकारी विटा संतोष भोर, तहसिलदार ऋषिकेश शेळके यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, गटविकास अधिकारी, सर्कल, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायतींचे सदस्य, तलाठी आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, कम्युनिटी आयसोलेशन सेंटर मध्ये अधिक चांगल्या सुविधा द्याव्यात. होम आयसोलेशन मधील रूग्ण घराबाहेर पडू नयेत यासाठी वेळोवेळी भेटी देवून तपासणी करावी. जास्तीत जास्त कोरोना बाधित व्यक्तींना कम्युनिटी आयसोलेशन सेंटर मध्ये ठेवा. सामुहिक कार्यक्रमामुळे कोरोना संसर्ग अधिक पसरण्याची शक्यता असल्याचे असे कार्यक्रम होणार नाहीत याची सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, पोलीस पाटील यांनी दक्षता घ्यावी. गावात कोरोना प्रादुर्भाव वाढणार नाही याबाबत गावातील लोकांचीही जबाबदारी आहे. होम आयसोलेशन मधील व्यक्तींचे स्टॅम्पिंग सुरू करावे. लसींच्या उपलब्धतेनुसार लस पुरवठा करण्यात येत असून लसीचा दुसरा डोस असणाऱ्यांना प्राधान्य द्यावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर करावा, असे आवाहन करून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, कोविड रूग्णांच्या उपचारासाठी पुरेशा प्रमाणात औषध साठा उपलब्ध ठेवावा. काही पोस्ट कोविड रूग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता भासते यासाठी ग्रामीण रूग्णालयांना ऑक्सिजन कॉन्सट्रेटर देण्यात आले आहेत ते गरजू रूग्णांना मोफत वापरासाठी द्यावेत. त्याचा वापर संपल्यानंतर ते परत घ्यावेत. याचे व्यवस्थापन गट विकास अधिकारी यांनी करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी कम्युनिटी आयसोलेशन सेंटर मधील रूग्णांशी संवाद साधून त्यांची विचारपूस केली. तसेच त्यांना मिळणारी औषधे, आरोग्य तपासणी व विविध सोयी सुविधांबद्दल विचारणा करून त्यांना धीर दिला. तसेच कम्युनिटी आयसोलेशन सेंटरमध्ये देण्यात येत असलेल्या सोयी सुविधांबद्दल समाधान व्यक्त केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.