Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दिलीप कुमार यांचं निधन, वयाच्या 98व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

 दिलीप कुमार यांचं निधन, वयाच्या 98व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन झाले आहे. ते 98 वर्षांचे होते. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयाचे डॉ.जलील पारकार यांनी ही माहिती दिली. आज संध्याकाळी 5 वाजता मुंबईतल्या जुहूमधल्या कबरस्तानात त्यांचं दफन करण्यात येईल. बुधवारी (7 जुलै) सकाळी 7.30 वाजता त्यांचं निधन झाल्याचं पारकर यांनी सांगितलं. वृद्धापकाळातील समस्यांमुळे दिलीप कुमार यांचे निधन झाल्याचं डॉ. पारकर यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने गेल्या महिन्यात सुद्धा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दिलीप कुमार यांना रविवारी (6 जून) सकाळी मुंबईमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं.

दिलीप कुमार यांच्या ट्वीटर हँडलवरुन सकाळी आठ वाजता त्यांचे निधन झाले असल्याची माहिती जाहीर करण्यात आली. त्याचे कौटुंबिक मित्र फैजल फारुकी यांनी ही माहिती दिली. दिलीप कुमार यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीसह जगभरातील त्यांच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.

दिलीप कुमार यांना श्रद्धांजली

'दिलीप कुमार यांच्या निधनाने एका युगाचा अंत झाला,'असं म्हणत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिलीप कुमार यांना श्रद्धांजली अर्पण केली.

ट्रॅजडी किंग दिलीप कुमार

'ट्रॅजडी किंग' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिलीप कुमारांनी सुमारे सहा दशकं त्यांनी आपल्या अभिनयाद्वारे चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवलं आहे. या काळात त्यांनी 63 चित्रपटात काम केलं. आपल्या कामामुळे अभिनयाच्या क्षेत्रात त्यांनी नवे आयाम प्रस्थापित केले.

सध्या पाकिस्तानात असलेल्या पेशावरमध्ये 11 डिसेंबर 1922 साली त्यांचा जन्म झाला. त्याचं मूळ नाव युसूफ खान होतं. त्यांचे वडील फळ व्यापारी होते.

'ज्वार भाटा' हा त्यांचा पहिला चित्रपट 1944 मध्ये प्रदर्शित झाला होता. 1998 मध्ये आलेल्या किला चित्रपटातली भूमिका त्यांची अखेरची भूमिका ठरली. मुघल-ए-आजम, नया दौर, देवदास, या चित्रपटातल्या त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या. भारतातच नाही तर पाकिस्तानातही त्यांचे असंख्य चाहते आहेत.

दिलीप कुमार सायरा बानो यांच्याबरोबर 11 ऑक्टोबर 1966 ला झाला. तेव्हा सायरा फक्त 25 वर्षांच्या होत्या तर दिलीप कुमारांचं वय 44 वर्षं होतं. त्यांना पद्मविभूषण हा भारताचा नागरी सन्मान आणि पाकिस्तानचा 'निशान-ए-इम्तिआज' या पाकिस्तानच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवण्यात आलं आहे. 2000-2006 या काळात त्यांनी राज्यसभेत खासदारपदही भूषवलं आहे.

देविकाराणींनी दिली संधी

एक दिवस आपल्या वडिलांशी भांडण झालं म्हणून दिलीप कुमार पुण्याला गेले. तिथे काहीतरी काम करून आपल्या पायावर उभं राहावं अशी त्यांची इच्छा होती. त्यांना इंग्लिश बोलता यायचं त्यामुळे त्यांना पुण्याच्या ब्रिटीश आर्मी कँटीनमध्ये सहायकाची नोकरी मिळाली.

तिथे त्यांनी आपलं सँडविच काऊंटर उघडलं. इंग्रज सैनिकांचा याला चांगला प्रतिसाद मिळाला. पण एक दिवस या कँटीनमध्ये आयोजित केलेल्या एका समारंभात भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचं समर्थन केल्याबद्दल त्यांना अटक झाली आणि त्यांचं काम बंद पडलं.


या अनुभवांचा उल्लेख दिलीप कुमार यांनी आपलं आत्मचरित्र 'द सबस्टन्स अँड द शॅडो' यात केला आहे.

पुण्यातलं काम गेल्यावर ते मुंबईत परत आले. पैसे कमवण्यासाठी ब्रिटिश आर्मी कँटमध्ये लाकडाच्या खाटा पुरवण्याचं काम मिळवण्यासाठी ते प्रयत्न करत होते. यासंदर्भात दादरला जात असताना चर्चगेट स्टेशनवर त्यांना त्यांचे परिचित आणि प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ मसानी भेटले. मसानी तेव्हा बॉम्बे टॉकीजच्या मालक देविका राणी यांना भेटायला जात होते.

त्यांनी यूसुफ खान यांना म्हटलं की चला माझ्याबरोबर, तुम्हालाही तिथे काही काम मिळून जाईल. आधी तर ते नाही म्हणाले पण चित्रपटाचा स्टुडिओ पाहायला मिळेल या आकर्षणापायी ते तयार झाले.

युसूफ खान कसे बनले दिलीप कुमार?

यूसुफ खान यांचं नशीब पालटणार होतं. बॉम्बे टॉकिज त्या काळातलं सगळ्यात प्रसिद्ध फिल्म प्रॉडक्शन हाऊस होतं. त्यांच्या मालक होत्या देविका राणी. त्या एक मोठी सिनेअभिनेत्री तर होत्याच पण त्याबरोबर एक दूरदर्शी महिला होत्या.

डॉ मसानींनी युसूफ खान यांनी ओळख देविका राणींशी करून दिली आणि कामाची शिफारस केली. देविका राणींनी विचारलं की तु अभिनेता बनशील का? त्यांनी यूसुफ खान यांना 1250 रूपयांची मासिक पगाराची नोकरी दिली. डॉ मसानींनी नोकरीला हो म्हण असा इशारा केला.

पण युसूफ खान यांनी देविका राणींचे आभार मानत म्हटलं की त्यांच्याकडे ना सिनेमात काम करण्याचा अनुभव आहे ना सिनेमाची समज. तेव्हा देविका राणींनी युसूफ खानला विचारलं की तुला फळांच्या व्यवसायातलं किती कळतं? त्यांनी उत्तर दिलं, "मी शिकतोय." यावर देविका राणी म्हणाल्या, "जर तू फळांचा व्यवसाय आणि फळांच्या शेतीबद्दल शिकतो आहेत तर फिल्म मेकिंग आणि अभिनयही शिकशील."

देविका राणींनी पुढे असंही म्हटलं की, "मला एक तरूण, गुड लुकिंग आणि शिकल्यासवरलेल्या अभिनेत्याची गरज आहे. तुझ्या चांगला अभिनेता बनण्याचे गुण आहेत."

अशा प्रकारे यूसुफ खान उर्फ दिलीप कुमार यांचा बॉम्बे टॉकिजमधला प्रवास सुरू झाला. ते शशिधर मुखर्जी आणि अशोक कुमार यांच्यासह अनेक नामांकित कलाकारांच्या अभिनयातले बारकावे शिकायला लागले. त्यांना रोज सकाळी सहा वाजता स्टुडिओत हजेरी लावावी लागत.

एकदिवस सकाळी ते स्टुडिओत पोहचले तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की देविका राणींनी त्यांना आपल्या केबिनमध्ये बोलावलं आहे. या भेटीबद्दल दिलीप कुमार आपल्या आत्मचरित्रात लिहितात, "देविका राणींनी सफाईदार इंग्लिशमध्ये मला म्हटलं की - यूसुफ मी तुला एक अभिनेता म्हणून लॉन्च करणार आहे. पण मला वाटतं की तुझं स्क्रीननेम काहीतरी वेगळं असावं."

"एक असं नाव ज्या नावाने तुला जग ओळखेल आणि प्रेक्षक त्याला तुझ्या रोमॅंटिक इमेजशी जोडून पाहतील. मला वाटतं दिलीप कुमार हे चांगलं नाव आहे. मी तुझ्या नावाबद्दल विचार करत होते तेव्हा अचानक माझ्या डोक्यात हा विचार आला. तुला कसं वाटतं हे नाव?"

दिलीप कुमार आपल्या आत्मचरित्रात लिहितात की, हे ऐकून माझी बोलती बंद झाली. ते आपलं नाव बदलण्यासाठी अजिबात तयार नव्हते. त्यांनी देविका राणींना विचारलं की, नाव तर खूप चांगलंय पण असं करण्याची खरंच गरज आहे का?

देविका राणींनी स्मित केलं आणि म्हणाल्या असं करण्यातच हुशारी आहे. त्यांनी सांगितलं, "मी खूप विचार करून हा निर्णय घेतला. मला वाटतं तुझं स्क्रीन नेम असायला हवं." दिलीप कुमार यांनी आत्मचरित्रात लिहिलंय की देविका राणींना माझं सिनेमातलं दीर्घ आणि यशस्वी करिअर दिसत होतं. अशात स्क्रीन नेम असणं फायद्याचं ठरणार होतं आणि या नावाला एक सेक्युलर अपीलही होतं.

देविका राणींना बाजारात काय खपतं याची समज होती. कोणत्याही ब्रँडला हिंदू-मुस्लीम दोन्ही समाजांनी आपलं समजलं तर त्यात जास्त फायदा आहे, हे त्यांना कळत होतं. अर्थात, त्या काळात फक्त मुस्लीम कलाकारांना नावं बदलावी लागत होती असं नव्हतं.

देविका राणींनी दिलीप कुमार यांच्या आधी आपले पती हिमांशु राय यांच्यासोबत 1936 मध्ये "अछुत कन्या' चित्रपट काढला होता आणि त्यात कुमुदलाल गांगुली यांना अशोककुमार या नावाने लॉन्च केलं होतं. दिलीप कुमार यांनी नाव बदलण्याच्या निर्णयासाठी विचार करायला वेळ मागितला. देविका राणी म्हणाल्या की, विचार कर पण फार वेळ लावू नकोस.

दिलीप कुमार देविका राणींच्या केबिनमधून बाहेर पडून स्टुडिओत काम करायला लागले. पण त्यांच्या डोक्यात नाव बदलण्याचेच विचार घुमत होते. त्यांचा चेहरा पाहून त्यांना शशिधर मुखर्जींनी विचारलं, "काय विचार करतो आहेस?"

तेव्हा दिलीप कुमारांनी देविका राणींसोबत जे बोलणं झालं त्याबद्दल सांगितलं. एक मिनिट थांबून शशिधर मुखर्जी म्हणाले, "मला वाटतं देविका बरोबर सांगताहेत. त्यांनी जे नाव सांगितलं ते मान्य केलंस तर तुझा फायदाच आहे. हे नाव खरंच खूप चांगलं आहे आणि दुसरं म्हणजे मी तर तुला कायमच यूसुफ याच नावाने ओळखेन ना."

या सल्ल्यानंतर यूसुफ खान यांनी दिलीप कुमार या स्क्रीन नेमचा स्वीकार केला आणि अमिय चक्रवर्तींच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या 'ज्वार भाटा' या चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं.

1944 साली प्रदर्शित झालेला हा दिलीप कुमार यांचा पहिला चित्रपट होता. पण हा चित्रपट चालला नाही.

दिलीप कुमार यांना एक सेक्युलर चेहरा बनवण्याचं स्वप्न देविका राणींनी पाहिलं होतं. येत्या काळात ते स्वप्न खरं ठरणार होतं. 'गोपी' चित्रपटात मोहम्मद रफी यांनी गायलेलं भजन 'सुख के सब साथी, दुख में ना कोई, मेरे राम, तेरा नाम' हे भजन गाताना दिलीप कुमार यांच्या चेहऱ्यावरचे भाव आणि अभिनयाने देविका राणींचं म्हणणं सार्थ ठरवलं होतं.

दिलीप कुमार यांनी 60 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये अभिनय केला. त्यातल्या फक्त मुगल-ए-आजममध्ये त्यांनी मुस्लीम भूमिका रंगवली.

दिलीप कुमारच नाही, हिंदी चित्रपटसृष्टीतल्या अनेक अभिनेते अभिनेत्रींनी आपलं नाव बदलून स्क्रीन नेम आपलसं करून यशाची शिखरं पादाक्रांत केली आहेत. यात हिंदू, मुस्लीम सगळेच आहेत. अशा कलाकारांची यादी मोठी आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.