Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भास्कर जाधव म्हणजे कोकणातील दशावतारमधले नरकासूर अन् तमाशातले सोंगाड्या

 भास्कर जाधव म्हणजे कोकणातील दशावतारमधले नरकासूर अन् तमाशातले सोंगाड्या


मुंबई - विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणाच्या ठरावावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचं दिसून आलं. सभागृह स्थगित झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या दालनात घातलेल्या गोंधळावरून विरोधी पक्षाचे १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे. १ वर्षासाठी हे निलंबन असणार आहे.

या निलंबनाच्या कारवाईवरून भाजपा आमदार नितेश राणे  यांनी सरकारवर प्रहार केला. नितेश राणे म्हणाले की, आमचे १२ आमदार सैनिकासारखे लढले. ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावरून त्यांचे निलंबन करण्यात आले. आम्ही कोकणातले आहोत, भास्कर जाधव कोकणातले आहेत, कोकणात दशावतार असतो. त्यात सोंगाड्या, नरकासूर भूमिका आहे. भास्कर जाधव सोंगाड्या, नरकासूर आहे अशी घणाघाती टीका नितेश राणेंनी केली.

तसेच तालिका अध्यक्षाच्या खुर्चीचा अपमान या सोंगाड्याने केला आहे. या नरकासूरावर विश्वास ठेवायची गरज नाही. मला आश्चर्य वाटतं ते रडले नाहीत, स्वत:चे कपडे फाडले नाहीत. या सरकारकडून काही अपेक्षा नाही, ओबीसी आरक्षणावरून आमचे सहकारी लढले आहेत. कोकणातली माणसं भास्कर जाधव यांना चांगलेच ओळखतात. हा माणूस सोंगाड्या, नरकासूर आहे असं नितेश राणे म्हणाले.

विधानसभा अध्यक्षांच्या दालनात काय घडलं?

तालिका अध्यक्ष भास्कर जाधव म्हणाले की, दहा मिनिटांसाठी सभागृह स्थगित केले. मी अध्यक्षांच्या कॅबिनमध्ये गेलो तेव्हा देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि त्यांचे आमदार तिथे आले होते. सभागृह स्थगित झालेले असताना अशाप्रकारे ते माझ्यासमोर आले. सभागृहाचा विषय सभागृहात थांबायला हवा होता. परंतु ते काही झालं नाही. त्यांनी वैयक्तिक घेण्याची गरज नव्हती. ते सगळे माझ्या तुटून पडले, मला शिवीगाळ केली, आई बहिणीवर शिव्या दिल्या. अंगावर येण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना सांगितले. याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा आहे. त्यानंतर काही नेत्यांनी मध्यस्थीकडून हा प्रकार थांबवण्याचा प्रयत्न केला असं त्यांनी सांगितले.

तसेच महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात असं कधीच घडलं नाही. महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासण्याचं काम विरोधी पक्षाच्या आमदारांनी केलं. छगन भुजबळांनी सभागृहात पुराव्यासकट ओबीसी आरक्षणावर भाष्य केले त्यामुळे विरोधक चिडले. जे घडलं तेच सांगितले. बाहेर वेगळे आणि आतमध्ये वेगळे ही माझी परंपरा नाही. जे आहे तेच सत्य बोललो. जर माझ्याबद्दल खोटं वाटत असेल तर सीसीटीव्ही कॅमेरा बघून कारवाई करावी. मी खोटा असल्याचं सिद्ध झालं तर जितकी शिक्षा तुम्हाला दिली आहे. ती तालिका अध्यक्ष असलो तरी मी घ्यायला तयार आहे असंही आव्हानही भास्कर जाधव यांनी विरोधकांना दिलं आहे.

सत्ताधाऱ्यांनी रचलं षडयंत्र

ओबीसी आरक्षणावरून सरकारची कोंडी होत असल्याचं कळताच सत्ताधाऱ्यांनी एक षडयंत्र रचलं. ओबीसींना राजकीय आरक्षण द्यायचं नाही यासाठी हा सगळा प्रयत्न सुरू आहे. २०२२ च्या निवडणुकीपर्यंत ओबीसींना आरक्षण न देण्याचा डाव आहे. सभागृहात विरोधकांचं संख्याबळ कमी व्हावं यासाठी सत्ताधाऱ्यांनी षडयंत्र रचण्यात आलं. त्यानंतर भाजपाच्या १२ आमदारांचे १ वर्षासाठी निलंबन करण्यात आलं असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांनी केला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.