Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

येडियुरप्पा मुख्यमंत्रीपदाचा राजनीमा देणार?

 येडियुरप्पा मुख्यमंत्रीपदाचा राजनीमा देणार?


बंगळुरू: कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा मुख्यमंत्रीपदाचा लवकरच राजीनामा देणार आहेत. वय आणि आरोग्याच्या तक्रारी आदी कारणांमुळे ते पदाचा राजीनामा देणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, येडियुरप्पा यांनी हे वृत्त फेटाळून लावलं आहे. आपल्या राजीनाम्याचं वृत्त निराधार असून त्यात काहीच तथ्य नाही, असं येडियुरप्पा यांनी म्हटलं आहे. 

कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा पदाचा राजीनामा देणार असल्याचं वृत्त एबीपी न्यूजने दिलं आहे. वाढते वय आणि त्यामुळे निर्माण झालेल्या आरोग्याच्या समस्या यामुळे येडियुरप्पा अधिककाळ मुख्यमंत्रीपदी राहणं शक्य नाही. त्यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन आरोग्याचं कारण पुढं करत राजीनामा देण्याची तयारी दाखवली होती. आज त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. त्यांच्याकडेही येडियुरप्पा यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवली. तेव्हा, लवकरच कर्नाटकाच्या पुढच्या मुख्यमंत्र्याबाबत पक्ष लवकरच निर्णय घेईल, असं आश्वासन नड्डा यांनी येडियुरप्पा यांना दिलं आहे. लवकरच कर्नाटकातील भाजपच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली जाईल. तोपर्यंत येडियुरप्पा हेच मुख्यमंत्री राहणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

पुढील मुख्यमंत्री कोण?

येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यास पुढील मुख्यमंत्री कोण असेल यावर आता चर्चा रंगली आहे. एक दोन दिवसात नव्या मुख्यमंत्र्यांचं नाव निश्चित केलं जाणार आहे. सध्या तरी मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये प्रल्हाद जोशी यांचं नाव सर्वाधिक चर्चेत आहे. जोशी हे मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत. ते उत्तर कर्नाटकचे खासदार आहे. त्यानंतर बीएल संतोष यांच्या नावाचीही मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा आहे. संतोष अनेक वर्षांपासून संघटन मंत्री म्हणून काम करत आहेत. सध्या ते भाजपचे राष्ट्रीय संघटन मंत्री आहेत. कुशल प्रशासक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्याशिवाय उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, भाजप नेते मुर्गेश निराणी आणि वसवराज एतनाल यांची नावेही मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेत आहेत.

2019मध्ये येडियुरप्पा मुख्यमंत्रीपदी

2018मध्ये कर्नाटकात भाजप सर्वाधिक जागा जिंकून नंबर वनचा पक्ष झाला होता. मात्र, बहुमतासाठीचा आकडा नसल्याने भाजपचा मुख्यमंत्री होऊ शकला नाही. केंद्रात दुसऱ्यांदा मोदी सरकार आल्यानंतर कर्नाटकात भाजप अॅक्टिव्ह झाला. कर्नाटकात काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांनी राजीनामा दिला. त्यामुळे 2019मध्ये येडियुरप्पा मुख्यमंत्री बनले. मात्र गेल्या काही महिन्यांपासून येडियुरप्पा यांच्या कामाच्या तक्रारी पक्षश्रेष्ठींकडे जात आहेत. त्यामुळे भाजपचे कर्नाटक प्रभारी अरुण सिंह यांनी कर्नाटकात जाऊन मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांशी चर्चा केली होती.

पक्षीय बलाबल

कर्नाटक विधानसभेतील सदस्यांची संख्या 224 आहे. 2018च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 119 जागा मिळाल्या होत्या. मात्र, त्यांना बहुमत मिळालं नव्हतं. तर काँग्रेसने 68 आणि जेडीएसने 32 जागांवर विजय मिळवला होता. तर अपक्षांचा दोन जागांवर विजय झाला होता. जेडीएसला कमी जागा मिळूनही काँग्रेसने जेडीएसला मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा दिला होता. 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.