किती दिवस भावी पंतप्रधान राहू, किमान राष्ट्रपतीपदाचा उमेदवार तरी बनवा"; भाजपाचा टोला
मुंबई - सध्या राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार केंद्रस्थानी आले आहेत. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेसच्या राहुल गांधींची भेट घेतली. या भेटीनंतर प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये सहभागी होतील असे संकेत दिले गेले. मात्र याच भेटीनंतर आणखी एका चर्चेला मोठं उधाण आलं आहे. आगामी 'राष्ट्रपती'पदाच्या निवडणुकीसाठी शरद पवार यांचा चेहरा पुढे करावा यासाठी प्रशांत किशोर लॉबिंग करत असल्याची दिल्लीत चर्चा आहे. याच दरम्यान भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी शरद पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे. "किती दिवस भावी पंतप्रधान राहू, किमान राष्ट्रपतीपदाचा उमेदवार तरी बनवा" असा टोला भातखळकरांनी लगावला आहे.
अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. तसेच राष्ट्रपती हा भाजपाचाच उमेदवार होईल असं देखील म्हटलं आहे. "शरद पवार यांनी पंतप्रधानपदाची महत्वाकांक्षा सोडलेली दिसते. त्याच्यामुळे अत्यंत हास्यास्पद हालचाली सुरू आहेत. राष्ट्रपतीपदाची निवडणूक विचारात घेतली तरी लोकसभा आणि राज्यसभेत भाजपाचं बहुमत आहे, त्यामुळे राष्ट्रपती हा भाजपाचाच उमेदवार होईल. त्यांना फक्त यातून प्रसिद्धीची ऊर्जा मिळते, याशिवाय त्यातून काही साध्य होणार नाही" असं म्हणत अतुल भातखळकर यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. टीव्ही 9 या वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे.
पंतप्रधानपदाचे योग्य उमेदवार म्हणून शरद पवार यांचा चेहराच योग्य आहे असे विधान शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले होते. या विधानावरून अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांना जोरदार टोला लगावला आहे. संजय राऊत यांनी केलेल्या विधानाची भातखळकर यांनी ट्विटरवरून खिल्ली उडवली आहे. ते म्हणाले की, कायमस्वरूपी भावी पंतप्रधान कोण हे महाभारतातले योद्धे संजय राऊत यांनी आधी निश्चित करावे. कधी ते उद्धव ठाकरेंच्या कोपराला गुळ लावतात, तर कधी शरद पवारांच्या, असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला. दरम्यान, 2024 च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना तगडी टक्कर द्यायची असेल तर शरद पवारांना पुढे करावं लागेल असं म्हटलं जात आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत की, भाजपाविरोधी आघाडी बनवायची असेल तर सध्या विरोधी पक्षाकडे चेहरा नाही. पंतप्रधानपदाचे योग्य उमेदवार म्हणून शरद पवारच योग्य चेहरा आहेत असं त्यांनी स्पष्टपणे सांगितले. विरोधकांची आघाडी बनवून मोदींना पर्याय उभा करायचा असेल तर शरद पवार चेहरा आहेत. तेच पंतप्रधानपदाचे उमेदवार ठरू शकतात. शरद पवारांच्या प्रयत्नांमुळेच महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला. त्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री बनले आहेत. देशपातळीवर असा प्रयोग करायचा असेल तर शरद पवार सर्वमान्य चेहरा आहे. तेच योग्य ठरतील असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.