Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महिलेच्या कौटुंबिक छळप्रकरणी सहभागी आध्यात्मिक गुरू रघुनाथ येमुल यांना अटक

 महिलेच्या कौटुंबिक छळप्रकरणी सहभागी आध्यात्मिक गुरू रघुनाथ येमुल यांना अटक


उच्चशिक्षित सुनेला सिगारेटचे चटके देऊन बहिरेपणा येईपर्यंत अमानुष मारहाण करणाऱ्या उद्योजक पती व कुटुंबातील तिघांसह आठ जणांविरुद्ध यापूर्वी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता याप्रकरणी उच्चभ्रू आध्यात्मिक गुरूंना चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली.

रघुनाथ राजाराम येमुल (48, रा. धवलगिरी अपार्टमेंट, बाणेर) असे अटक केलेल्या गुरुजींचे नाव आहे. याबाबत 27 वर्षीय पीडित विवाहितेने फिर्याद दिली आहे. ही घटना जानेवारी 2017 पासून गुन्हा दाखल होईपर्यंतच्या कालावधीत घडली आहे. या प्रकरणात पती गणेश नानासाहेब गायकवाड (36) यांच्यासह सासरच्या आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सात जणांना अटकपूर्व जामीन झाला असून, पती गणेश आणि राजू अंकुश हे फरार झाले आहेत.

रघुनाथ येमुल गुरुजी यांनी फिर्यादी महिलेचे पती गणेश गायकवाड यांना 'तुझी बायको पांढऱ्या पायगुणांची आहे. तिची जन्मवेळ चुकीची आहे, त्यामुळे ग्रहमान दूषित झाले आहेत. जर ही बायको म्हणून कायम राहिली तर तू आमदार होणार नाही, मंत्री होणार नाहीस. त्यामुळे तिला लवकर सोडचिठ्ठी दे आणि तुझा मुलगा तिच्याकडून काढून घे. मी दिलेला लिंबू उतरविल्यावर तुझ्या मागची पीडा कायमची निघून जाईल.' त्यानंतर पती गणेश यांनी बायकोवरून लिंबू ओवाळून टाकले होते. संसार मोडण्यासाठी अनिष्ट रुढी-परंपरा, अघोरी कृत्याचा वापर झाल्याचे पुरवणी जबाबात फिर्यादी महिलेने नमूद केले आहे. गुन्ह्यातील सहभाग लक्षात आल्यानंतर येमुल गुरुजींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी दिली आहे.

येमुल गुरुजींचा राजकीय तसेच प्रशासनातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांशी स्नेह आहे. गुरुजींच्या दरबारात अनेकजण भविष्य पाहण्यासाठी येत होते. त्यामुळे संबंधित प्रकरणात गुरुजीला अटक झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.