ग्रामीण भागातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी स्थानिक प्रशासनाने कठोर भूमिका घेऊन काम करावे - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
सांगली, दि. 17, ग्रामीण भागात कोरोनाचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनाने कडक भूमिका घ्यावी त्याचबरोबर गावातील लोकप्रतिनिधींनीही नैतिक जबाबदारी स्वीकारून प्रसंगानुरूप कडक अंमलबजावणीस सर्वतोपरी सहकार्य करावे. थोडेसे वाईट पण घेण्याची वेळ आली तरी ते घ्यावे, यातून गावाचा फायदाच होईल.अन्यथा तिसऱ्या लाटेला आपल्याला सामोरे जावे लागेल त्यासाठी ग्रामीण जनतेनेही प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी म्हैशाळ, नरवाड आरग,बेडग या गावांना भेटी देऊन कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी प्रांताधिकारी समीर शिंगटे तहसीलदार डी. एस.कुंभार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच,सदस्य, आरोग्य विभागातील डॉक्टर्स उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी पुढे म्हणाले, ग्रामीण स्तरावर स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. लोकप्रतिनिधींनीही आपली जबाबदारी न झटकता प्रशासनाला सहकार्य देणे हे त्यांचे कर्तव्य आहे. स्थानिक प्रशासनाने ही कोरोना परिस्थितीत लोकप्रतिनिधींशी समन्वय साधून प्रत्येक परिस्थितीशी त्यांना अवगत करून निर्णय घ्यावेत. यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करणे सोईचे होईल. कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी गावामध्ये जास्तीत जास्त कोरोना चाचणीवर भर देण्यात यावा. जे व्यक्ती कोरोना बाधित आढळतील त्यांना त्यांच्या घरी विलागीकरन करण्याची योग्य सोय असेल तरच गृह विलगीकरणात ठेवण्याची परवानगी देण्यात यावी.
अन्यथा गावांमधील संस्थात्मक विलगीकरण कक्षात त्यांना ठेवण्यात यावे. जर एखादी व्यक्ती घरात सोय नसतानाही संस्थात्मक विलगीकरण कक्षात येण्यास नकार देत असेल तर त्यांचे प्रथम समुपदेशन करावे. त्यातूनही ते ऐकत नसतील तर संबंधितांवर दंडात्मक कारवाई करावी. दंडात्मक कारवाई करूनही जर कोणी दाद देत नसतील तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत असे आदेश त्यांनी यावेळी दिले व अशा व्यक्तींना सक्तीने संस्थात्मक विलगीकरण कक्षात दाखल करावे. अशाप्रकारे कडक धोरण अवलंबविल्या शिवाय कोरोना आटोक्यात येणार नाही. त्याचबरोबर जसजशा कोरोना लसी प्राप्त होतील तसतसे गावातील लसीकरण करण्यात यावे. दुसऱ्या डोसला प्राधान्य देण्यात यावे. खाजगी डॉक्टरांकडे औषध उपचार घेणाऱ्या व्यक्तींनीही कोरोना बाधित असल्यास स्थानिक प्रशासनाला सुचित करावे. जे डॉक्टर कोरोना बाबत उपचार करत आहेत त्यांनीही कोरोना बाधित रुग्णांची माहिती त्वरित स्थानिक प्रशासनाला द्यावी. ग्रामीण भागातील स्थानिक प्रशासनाने कोरोना संबंधित कोणत्याही अडचणी उद्भवल्यास तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.