ADR चा अहवाल जाहीर; मोदींच्या मंत्रिमंडळातील ३३ मंत्र्यांविरोधात दाखल आहेत गुन्हे!
नवी दिल्ली - गेल्या अनेक दिवसांपासून सुरू चर्चेत असलेला केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार अखेर बुधवारी पार पडला. बुधवारी एकूण ४३ मंत्र्यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे केंद्रीय मंत्र्यांची एकूण संख्या आता ७८ झाली आहे. पण, यापैकी तब्बल ४२ टक्के अर्थात ३३ मंत्र्यांविरोधात गुन्हे दाखल असून त्यातील २४ जणांविरोधात हत्या, हत्येचा प्रयत्न, दरोडा यासारखे गंभीर गुन्हे देखील दाखल आहेत.
नुकताच यासंदर्भातीस अहवाल ADR ने जाहीर केला असून त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या मंत्रिमंडळासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार वरील निष्कर्ष मांडण्यात आले आहेत. असोसिएशन फॉर डेमॉक्रेटिक रिफॉर्म्सकडून (एडीआर) अशा प्रकारचे अभ्यास अहवाल प्रकाशित केले जातात. एडीआरच्या ताज्या अहवालानुसार, एकूण ७८ केंद्रीय मंत्र्यांपैकी ३३ मंत्र्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत. शिवाय, २४ मंत्र्यांविरोधात हत्या, हत्येचा प्रयत्नसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या सर्वांनी निवडणुकीच्या वेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये दिलेल्या माहितीवरून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
दरम्यान, यंदाच्या मंत्रिमंडळातील सर्वात तरुण मंत्री ठरलेले ३५ वर्षीय निसित प्रामाणिक यांच्याकडे केंद्रीय गृहराज्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पण, त्यांच्या विरोधात भादंविच्या कलम ३०२ नुसार हत्येचा गुन्हा दाखल आहे. याशिवाय, जॉन बारला, पंकज चौधरी आणि व्ही मुरलीधरन या तिघांविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा (भादंवि ३०७) गुन्हा दाखल आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.