साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर; मी हेमंत करकरेंना देशभक्त मानत नाही..
भोपाळ : भोपाळच्या भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर या आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असतात. त्या आता पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत. काही लोकांसाठी मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले आयपीएस अधिकारी हेमंत करकरे हे देशभक्त असतील, पण करकरेंना मी देशभक्त मानत नसल्याचे प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या.
2008 साली मालेगावात झालेल्या स्फोटातील साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर या एक आरोपी आहेत. त्यावेळचे महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांनी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना अटक करत, त्यांची चौकशी केली होती. दरम्यान, आपल्या शापामुळेच महाराष्ट्र केडरचे आयपीएस हेमंत करकरे यांचा मृत्यू झाल्याचे वक्तव्य प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी काही वर्षांपूर्वी केले होते.
सध्या सोशल मीडियावर यासंबंधीचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यामध्ये प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणतात की, काही लोक हेमंत करकरे यांना देशभक्त मानतात. पण खरे देशभक्त असलेले लोक त्यांना देशभक्त मानत नाहीत. मी माझे जीवन देशासाठी समर्पित केले आहे. त्यांनी माझ्यासारख्या स्वयंसेवकाला त्रास दिला.
1975 साली देशात एक आणिबाणी लागली होती. तशाच प्रकारची आणखी एक आणिबाणी ही 2008 साली लागल्याचे सांगत या प्रकरणात आपल्याला गोवण्यात आल्याचा आरोपही प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केला. हेमंत करकरे यांनी आपल्याला शिक्षण देणाऱ्या आचार्यांच्या हाताची बोटे तोडल्याचेही प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.