‘जीआय’ मानांकित केळी प्रथमच अरब देशात !
रावेर : निर्यातीसाठी उत्कृष्ट दर्जा असलेली आणि ‘जीआय’ मानांकन मिळालेली जिल्ह्यातील तांदलवाडी येथील महाजन बंधूंची केळी प्रथमच समुद्रमार्गे दुबईला रवाना करण्यात आली. केंद्र सरकारच्या कृषी विभागांतर्गत असलेल्या ‘अपेडा’च्या माध्यमातून ही केळी निर्यात झाली आहे. या वर्षीच्या केळी निर्यातीच्या हंगामाच्या शेवटी ही निर्यात झाली असली तरीही आगामी वर्षीच्या मार्चपासून सुरू होणाऱ्या हंगामात मोठ्या प्रमाणावर जीआय मानांकन असलेली केळी निर्यात करण्याचे ‘अपेडा’चे उद्दिष्ट आहे.
तांदलवाडी (ता. रावेर) येथील प्रयोगशील आणि प्रगतिशील शेतकरी प्रेमानंद महाजन आणि प्रशांत महाजन यांच्या शेतातील ही निर्यातक्षम केळी कंटेनरमध्ये भरून मुंबई येथे पाठविण्यात आली होती. सोमवारी झालेल्या ऑनलाइन कार्यक्रमात या केळी कंटेनरला दुबईत पाठविण्यासाठी अपेडाचे चेअरमन एम. अँगायूथू यांनी हिरवी झेंडी दाखविली. जिल्ह्यातील ९० केळी उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या दर्जेदार केळी उत्पादनासाठी ‘जीआय’ मानांकन मिळाले आहे. ‘जीआय’ मानांकनाची केळी ही दर्जामध्ये सर्वोत्कृष्ट समजली जाते आणि ग्राहकांमध्ये अशा केळीची मोठी मागणी असते. जिल्ह्यातील केळीला हे ‘जीआय’ मानांकन मिळण्यासाठी तांदलवाडी येथील निसर्गराजा कृषी विज्ञान मंडळाने २०१७ पासून केलेल्या प्रयत्नाला आता यश आले आहे. सोमवारी (ता. १४) झालेल्या या ऑनलाइन कार्यक्रमात अपेडाचे जनरल मॅनेजर आर. रवींद्र, यू. के. वॉट्स, संचालक तरुण बजाज, निर्यातक व्यापारी अजित देसाई आणि केळी उत्पादक शेतकरी प्रशांत महाजन यांनी आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. सुधांशू यांनी कार्यक्रमाचा समारोप केला.
पुढील वर्षी निर्यात वाढणार
सध्या केळी निर्यातीचा हंगाम संपत आला आहे. मात्र, सोमवारी हे कंटेनर भरून पाठविल्यामुळे अरब देशात ‘जीआय’ मानांकनाच्या केळीचा प्रचार, प्रसार होईल आणि पुढील वर्षी मार्चपासून सुरू होणाऱ्या केळी निर्यातीच्या हंगामात मोठ्या प्रमाणावर केळी निर्यात करता येईल, असे अपेडाचे उद्दिष्ट आहे.
‘अपेडा’कडून अनुदान मिळावे : महाजन
जीआय मानांकन मिळालेल्या केळीची निर्यात करण्याची पहिली संधी मिळाल्याबद्दल अपेडाचे आभार मानून प्रशांत महाजन यांनी या ऑनलाइन कार्यक्रमात सांगितले, की जीआय मानांकन मिळालेल्या केळीची निर्यात वाढण्यासाठी अपेडाकडून मोठ्या मदतीची अपेक्षा आहे. केळीच्या फ्रूट केअरसाठी अनुदान, तसेच परिसरात पॅक हाइसेस आणि कोल्ड स्टोरेज मोठ्या प्रमाणात उभारल्यास जिल्ह्यातून केळी निर्यातीला आणखी मोठ्या प्रमाणावर संधी मिळेल, अशीही अपेक्षा श्री. महाजन यांनी व्यक्त केली. यावर अपेडाच्या अधिकाऱ्यांनी अनुकूलता दाखवत आगामी वर्षी इराक, इराण, सौदी अरेबिया, ओमान आदी देशांमध्येही केळी निर्यात करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.