रस्त्यासाठी जेष्ठ नागरिकांचे आंदोलन यापुढे अधिकाऱ्यांच्या दालनात चिखल फेक आंदोलन : ॲड. अमित शिंदे
सांगली दि.: विश्रामबाग मधील दत्तनगर या भागातील ड्रेनेज कामासाठी उकरून ठेवलेल्या मुख्य रस्त्याची पावसामुळे प्रचंड दयनीय अवस्था झालेली आहे. वारंवार मागणी करून देखील प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे शेवटी वैतागून भागातील ज्येष्ठ नागरिकांनीच ॲड. अमित शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निषेध व्यक्त करत आंदोलन केले.
ड्रेनेज च्या कामासाठी खोदलेल्या या रस्तावरील काम रेंगाळत ठेवलेले आहे. पावसामुळे या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. लोकांना येणे जाणे मुश्कील झाले आहे. या भागातील ज्येष्ठ नागरिकांनी महापालिका अधिकारी, स्थानिक नगरसेवक, आमदार यांना सांगून हा प्रश्न सोडवण्याची विनंती केली. परंतु या कामाच्या ठेकेदाराने अधिकारी नगरसेवकांसह आमदारांना देखील ठेंगा दाखवला आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या ज्येष्ठ नागरिकांनी महापालिका व ठेकेदार याचा निषेध करत आंदोलन केले.
यावेळी ॲड. अमित शिंदे यांनी महापालिका अधिकाऱ्यांना संपर्क साधून तात्काळ काम करण्याबाबत कळवले. ॲड. शिंदे म्हणाले की, दत्तनगर हा विश्रामबाग च्या मध्यवर्ती लोकवस्तीचा भाग आहे. या भागामधील ड्रेनेजची कामे रखडून ठेवल्यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या रस्त्याचे काम तात्काळ सुरू न झाल्यास रस्त्यावर साठलेला राडारोडा चिखल अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये नेऊन टाकला जाईल.
सुभाष तोडकर म्हणाले, गेले कित्येक महिने हे काम काम पूर्ण होण्यासाठी ठेकेदाराकडे तसेच स्थानिक नगरसेवक व आमदारांकडे पाठपुरावा करत आहोत. परंतु ठेकेदारांनी आमदार व नगरसेवकांनी जुमानले नाही त्यामुळे हे काम वेळेत होऊ शकले नाही. आता झालेल्या पावसामुळे रस्त्याची अवस्था दयनीय झालेली आहे.
शांतीनाथ आवटी म्हणाले की, रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे चालणे देखील अवघड झाले आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रश्न सोडवण्याची गरज आहे. बाबासाहेब पाटील म्हणाले की, जेष्ठ नागरिकांना रस्यावर येऊन आंदोलन करण्याची वेळ येणे ही महापालिका प्रशासनासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे.
महापालिका प्रशासनाने तात्काळ रस्त्याचे काम सुरू न केल्यास महापालिका दारात आंदोलन करण्याचा इशारा जेष्ठ नागरिकांनी दिला. यावेळी राजाराम दळवी, गोरख पाटील, संजय बनसोडे, पासगोंडा पाटील, डी बी माने, श्री कुंभार, धनपाल रुईकर, श्री गडदे उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.